मुंबई
nitesh rane महाराष्ट्राचे बंदरे विकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांना २०१३ मधील गोव्यातील धारगळ-पेडणे टोल नाका तोडफोड आणि मारहाण प्रकरणात मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता केली असून, तब्बल १३ वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याचा शेवट न्यायालयाच्या या निर्णयाने झाला आहे.
या प्रकरणाची सुरुवात ३ डिसेंबर २०१३ रोजी झाली होती. त्यावेळी 'स्वाभिमान संघटना'चे प्रमुख असलेले नितेश राणे आपल्या समर्थकांसह सावंतवाडीहून गोव्यातील कळंगुट येथे एका खासगी कार्यक्रमासाठी जात होते. त्यांचा वाहनांचा ताफा धारगळ टोल नाक्यावर पोहोचला असता, टोल कर्मचाऱ्यांनी नियमानुसार प्रवेश शुल्काची मागणी केली. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेत टोल कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याचा तसेच टोल बूथची तोडफोड केल्याचा आरोप करत पेडणे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
या तक्रारीच्या आधारे पेडणे पोलिसांनी नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा नोंदवून म्हापसा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्यात एकूण नऊ आरोपींचा समावेश होता. सुनावणीदरम्यान काही वेळा नितेश राणे न्यायालयात गैरहजर राहिल्याने काही दिवसांपूर्वी म्हापसा न्यायालयाने त्यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. तसेच त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले होते.
अंतिम सुनावणीदरम्यान न्यायालयाने उपलब्ध पुरावे, साक्षी आणि दोन्ही पक्षांचा युक्तिवाद यांचा सखोल विचार केला. त्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयामुळे त्यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला असून, या निकालाकडे महाराष्ट्र आणि गोव्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.नितेश राणे यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात नितेश राणे यांच्यासह आणखी आठ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला होता. घटनेच्या दिवशी महाराष्ट्रातून गोव्याकडे एका खासगी कार्यक्रमासाठी जात असताना नितेश राणे यांचा टोल बूथ कर्मचाऱ्यांशी कथित वाद झाला होता. त्यानंतर नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टोल नाक्याची तोडफोड केली तसेच तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा सरकारी पक्षाचा आरोप होता. मात्र, हे आरोप न्यायालयात सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आल्याने न्यायालयाने अखेर नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता केली.