एक विजय अन् भारताचा झिम्बाब्वेवर कब्जा!

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
हरारे,
india conquers zimbabwe भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० मालिकेत टीम इंडियाने पहिल्या सामन्यात विजय मिळवत आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील उर्वरित दोन सामने सलग दोन दिवस खेळवले जाणार आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस सामन्यांनी भरलेले असणार आहेत. मालिकेतील दुसरा सामना २५ जुलै रोजी, तर तिसरा सामना २६ जुलै रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही सामने हरारे येथे होणार असून, भारतीय प्रमाणवेळेनुसार सामन्याला सायंकाळी ४:३० वाजता सुरुवात होईल. त्यापूर्वी दुपारी ४ वाजता नाणेफेक होणार आहे. दोन्ही सामन्यांमध्ये केवळ एका दिवसाचे अंतर असल्याने खेळाडूंना सलग सामने खेळावे लागणार आहेत.
 
india conquers zimbabwe
 
पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाला मालिकेवर कब्जा करण्याची संधी आहे. २५ जुलै रोजी होणारा सामना जिंकल्यास टीम इंडिया मालिका खिशात घालेल. त्यानंतर २६ जुलै रोजीचा सामना जिंकून भारताला झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत क्लीन स्वीप करण्याची संधी असेल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अखेर पहिला विजय नोंदवला आहे. यापूर्वी त्याच्या कर्णधारपदाखाली खेळलेल्या सात सामन्यांमध्ये भारताला सहा पराभव पत्करावे लागले होते, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धचा विजय हा श्रेयस अय्यरसाठी कर्णधार म्हणून विशेष ठरला.
 
गुरुवारी झालेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि इशान किशन यांच्या प्रभावी फलंदाजीच्या जोरावर भारताने सात गडी राखून सहज विजय मिळवला. या कामगिरीनंतर कर्णधार श्रेयस अय्यरने युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचे कौतुक केले. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या पराभवांमुळे भारतीय संघाचे मनोधैर्य काहीसे खचले होते. मात्र, झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील विजयामुळे संघाला मोठा आत्मविश्वास मिळाला आहे. आता उर्वरित दोन्ही सामने जिंकून मालिका ३-० अशी जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. श्रेयस अय्यर पुढील दोन सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व कशा पद्धतीने करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.