नवी दिल्ली,
panshul-bansal-opinion : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) पुनरपरीक्षेत ७२० पैकी ७१५ गुण मिळवून देशात दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या हरियाणाच्या पंशुल बन्सल याने प्रश्नपत्रिका फुटीनंतर देशात सुरू असलेल्या आंदोलनांवर आपले मत मांडले आहे. रस्त्यावर उतरून विरोध दर्शवण्याऐवजी घरातच राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आणि या परिस्थितीचा उपयोग गुण वाढवण्यासाठी करणे पसंत केल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय
एका वृत्तवाहिनीशी बोलताना पंशुलने सांगितले की, "पहिली परीक्षा रद्द झाल्याचे समजताच सुरुवातीला खूप निराशा झाली होती. परंतु, बराच काळ निराश राहण्याऐवजी मी स्वतःला विचारले की मी आंदोलनात का सहभागी व्हावे? त्यापेक्षा घरात राहून अभ्यास करणे, कौशल्यात सुधारणा करणे आणि अधिक गुण मिळवणे हे मी योग्य मानले."
गुण ७०६ वरून ७१५ वर पोहोचले
पंशुलने सांगितले की, मूळ परीक्षेत त्याला ७०६ गुण मिळाले होते. मात्र, परीक्षा रद्द झाल्यानंतर अवघ्या एक-दोन तासांतच त्याने सकारात्मक विचार करून पुन्हा तयारी सुरू केली. या कठोर परिश्रमांमुळे पुनरपरीक्षेत त्याचे गुण वाढून ७१५ झाले आणि त्याने देशात दुसरा क्रमांक मिळवला. पंशुल हा दिल्लीतील ग्रेटर कैलास भागातील एका शाळेचा विद्यार्थी आहे.
देशभरात आंदोलनाचा भडका
पंशुलचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा प्रश्नपत्रिका फुटीच्या विरोधात देशभरात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत संसदेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक होऊन पोलिसांनी अश्रूधुराचा व लाठीमाराचा वापर केला होता, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. सध्या या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) सुरू आहे.