पारवा बसस्थानकाला अवकळा : चिखलात फसली एसटी बस

विद्यार्थी, प्रवाशांनी धक्का मारत बस काढली बाहेर

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पारवा, 
parva-bus-stand : घाटंजी तालुक्यातील 42 गावांचे मुख्य केंद्र असलेल्या पारवा बसस्थानकाची सद्यस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. पावसाळ्यामुळे संपूर्ण बसस्थानक परिसरात चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
 
 
y24July-Bus
 
शुक्रवार, 24 जुलै रोजी येथे एक एसटी बस चिखलात अडकून नादुरुस्त झाल्याची घटना घडली. अखेर बसस्थानकातील प्रवासी आणि शाळकरी विद्यार्थ्यांनीच या एसटी बसला कसेबसे ढकलत चिखलातून बाहेर काढले. या घटनेने एसटी महामंडळाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
 
 
प्रवेशद्वारासमोर चिखलाचे साम्राज्य, चालकांची कसरत गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे बसस्थानकाच्या मुख्य गेटसमोर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे स्थानकाला तळ्याचे स्वरूप आले आहे. आगाराच्या बसेस आत नेताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शुक्रवारी चिखलाचा अंदाज न आल्याने एक बस तिथेच अडकून पडली, ज्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.
 
 
विद्यार्थी आणि प्रवाशांचे हाल पारवा हे परिसरातील सुमारे 40 ते 42 गावांचे मुख्य केंद्र असल्याने येथे दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थी आणि प्रवासी येत असतात. मात्र, बसस्थानकाची झालेली दुरवस्था पाहता प्रवाशांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. गाड्या फेल होत असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचता येत नाही आहे. बसला धक्का मारताना विद्यार्थ्यांचे कपडे आणि दप्तर चिखलाने माखत असल्याचा संताप पालकांनी व्यक्त केला.
डांबरीकरणाची प्रतीक्षा
 
 
येथून मांडवी-दारव्हा, यवतमाळ-आदिलाबाद, रामटेक-किनवट अशा अनेक लांब पल्ल्याच्या एसटी बस धावतात. टिपेश्वर अभयारण्याकडे जाणारे पर्यटकही याच मार्गाचा वापर करतात. एवढे महत्त्वाचे स्थानक असूनही आजतागायत येथे साधे खडीकरण किंवा डांबरीकरण करण्यात आले नाही. लोकप्रतिनिधी आणि एसटी महामंडळाने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन खड्डे बुजवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.