पुलगाव रेल्वे स्थानकाचा कायापालट अंतिम टप्प्यात

अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत पुनर्विकास

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
वर्धा,
pulgaon railway station मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत येणार्‍या पुलगाव रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत वेगाने पुनर्विकास करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत स्थानकावर प्रवाशांसाठी आधुनिक, सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या प्रकल्पास २०२३-२४ या आर्थिक वर्षात मंजुरी मिळाली असून त्याची अंमलबजावणी जनरल सर्व्हिसेस युनिट मार्फत करण्यात येत आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
 

pulgaon railway station redevelopment reaches final stage under amrit bharat station scheme 
अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत पुलगाव स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्यात येत आहे. यामध्ये स्थानकाच्या सर्युलेटिंग एरियाचा विकास, वाहनतळाचे सुशोभीकरण, आकर्षक लॅण्डस्केपिंग, संरक्षक भिंतीचे बांधकाम, प्रवेशद्वार व पोर्चचे नूतनीकरण, स्वच्छतागृहांचे आधुनिकीकरण, स्थानक इमारतीच्या दर्शनी भागाचे सुशोभीकरण, नवीन तिकीट आरक्षण कार्यालय-सह-प्रतीक्षालय, १२ मीटर रुंदीचा पादचारी उड्डाणपूल व चार लिफ्टची उभारणी, प्लॅटफॉर्मवर सहा बेंचे कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म, उच्च दर्जाचे टिकाऊ फर्निचर तसेच आधुनिक दिशादर्शक फलक व स्थानक नामफलकांची उभारणी यांचा समावेश आहे.
या प्रकल्पांतर्गत अनेक महत्त्वाची कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. याशिवाय ऑटो अनाउन्समेंट सिस्टीम, कोच गाईडन्स डिस्प्ले बोर्ड, सिंगल लाईन डिस्प्ले बोर्ड, ‘अ‍ॅण्ट अ ग्लान्स’ डिस्प्ले बोर्ड, मल्टी लाईन डिस्प्ले बोर्ड, जीपीएस घड्याळे आणि इंडोअर व्हिडिओ डिस्प्ले प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून प्रवाशांसाठी नवीन फर्निचरची व्यवस्थाही पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित कामे सध्या वेगाने सुरू आहेत. १२ मीटर रुंदीच्या पादचारी उड्डाणपुलाचे लॉन्चिंगचे काम पूर्ण झाले असून डेक शीट बसविण्याचे सुमारे ६५ टके काम पूर्ण झाले आहे. चारही लिफ्टच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले असून स्टील स्ट्रचर उभारणीचे सुमारे ४० टके काम पूर्ण झाले आहे. मुख्य प्रवेशद्वारावरील स्थानक नामफलक, नवीन पादचारी उड्डाणपुलावरील लिफ्ट बसविण्याचे काम तसेच उर्वरित दिशादर्शक फलक बसविण्याचे कामही प्रगतीपथावर आहे.