मुंबई,
mumbai gujarat route महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोन्ही राज्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई-गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, ३५ ते ४० किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हजारो वाहने महामार्गावर अडकून पडली आहेत. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील तपासणी नाक्याजवळील परिस्थिती अधिकच बिकट झाली असून, वापी तपासणी नाका सध्या बंद करण्यात आला आहे.
गेल्या ७२ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांमधील वाहतूक आणि संवाद यंत्रणेवर मोठा परिणाम झाला आहे. महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाल्याने अनेक प्रवाशांना पुढे जाण्याचा किंवा मागे परतण्याचा मार्ग मिळत नसून, त्यांना रस्त्यावरच थांबावे लागत आहे. महाराष्ट्रातून गुजरातच्या दिशेने जाणारे लष्करी जवानही या वाहतूक कोंडीत अडकले आहेत. काही काळ पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाल्याने अडचणी आणखी वाढल्या आहेत.
पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. दक्षिण गुजरातमधील रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सात पॅसेंजर गाड्या मध्य प्रदेशातील विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या. पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागाचे जनसंपर्क अधिकारी मुकेश कुमार यांनी सांगितले की, मुंबई सेंट्रल विभागातील घोलद-उमरगाम रोड सेक्शनमधील एका पुलावर पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा वर गेल्याने दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे रतलाम, नामली, नागदा, मेघनगर, लिमखेडा, थांडला रोड आणि बामनिया या स्थानकांवर गाड्या थांबवण्यात आल्या.
दरम्यान, महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांत पावसामुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून, स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन पथकांनी रात्रभर बचावकार्य राबवले. पूरग्रस्त भागातून २४४ जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. परिस्थिती लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव शुक्रवारी जिल्ह्यातील शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध यंत्रणांच्या संयुक्त मदत आणि बचावकार्याची सांगता पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास झाली. मुसळधार पावसामुळे पालघरमधील अनेक भाग जलमय झाले असून, डहाणू आणि तलासरी तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.