बांध तलावावरील प्राणघातक हल्ल्यानंतर भीतीचे सावट

- सकाळच्या फिरण्यावर विरजण ः आरोपी अद्याप मोकाट

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
गोंदिया, 
deadly-attack-at-the-damlake : गोंदिया शहरातील रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सूर्याटोला येथील बांध तलाव परिसरात सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या निवृत्त तहसीलदार प्रदीप अपाल यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी 23 जुलै रोजी घडलेल्या या घटनेनंतर शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला येणार्‍या नागरिकांनी बांध तलावाकडे पाठ फिरविली. त्यामुळे परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. दरम्यान, घटनेतील आरोपीचा अद्यापही शोध लागलेला नसून रामनगर पोलिस विविध पथकांच्या माध्यमातून तपास करीत आहेत.
 
 
k
 
 
 
शहरातील सर्वात मोठ्या बांध तलावाचे सौंदर्यीकरण नगर परिषदेकडून करण्यात आल्यामुळे येथे दररोज सकाळ-सायंकाळ शेकडो नागरिक फिरण्यासाठी येतात. दरम्यान, गुरुवारी सकाळी सूर्याटोला येथील 68 वर्षीय निवृत्त तहसीलदार प्रदीप आपले हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वाक करून घरी परत जात असताना त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला करून डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. यावेळी हल्लेखोराने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी व अंगठी लुटून घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी बांध तलाव परिसरात कुणीही फिरण्यासाठी आले नाही. परिणामी बांधतलाव परिसर ओस पडलेला दिसून आला. तेव्हा बांध तलाव परिसरात सकाळ व सायंकाळच्या वेळेत नियमित पोलिस गस्त वाढविणे, तलाव परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच पुरेशी प्रकाशयोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
 
 
नागरिकांचे रामनगर पोलिसांना निवेदन
 
 
सदर घटनेचा निषेध व्यक्त करत सूर्याटोला परिसरातील नागरिकांनी रामनगर पोलिस ठाणे गाठून बांधतलाव परिसरात तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे. यावेळी पोलिस निरीक्षकांना निवेदनही देण्यात आले आहे.
 
 
घटनेतील आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिस विभागातील विविध पथके कामाला लागली असून सर्व स्तरांवर तपास सुरू आहे. आरोपीचा लवकरच शोध लावण्यात येईल.
- तिरुपती राणे, पोलिस निरीक्षक रामनगर