तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
stray-animal-accident : यवतमाळ नगर परिषदेच्या हद्दीतील प्रमुख रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट जनावरांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ‘साहेब, आवरा या मोकाट जनावरांना..’ असे म्हणण्याची वेळ आता यवतमाळकरांवर आली आहे. तरीदेखील या गंभीर समस्येकडे नगर परिषद प्रशासनाकडून सपशेल पाठ फिरवली जात आहे.
शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि वर्दळीच्या परिसरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत असून ही बाब नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर चिंतेचा विषय बनली आहे. अनेकदा भररस्त्यातच सांड, गायी व इतर जनावरांमध्ये जोरदार झुंज आणि धडक होत असल्याने वाहनचालक, पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच लहान मुलांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत आहे.
अशा घटनांमुळे वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच मोठे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शाळा सुरू झाल्यामुळे हजारो विद्यार्थी दररोज याच रस्त्यांवरून ये-जा करीत आहेत. एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम हाती घेऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची अपेक्षा आहे.
याशिवाय, मोकाट जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध होत नसल्याने ती रस्त्यांवरील कचèयातील प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग, पॉलिथिन तसेच इतर घातक वस्तू खात आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून अनेक जनावरांचा जीवही धोक्यात येत आहे. ही बाब पशुकल्याणाच्या दृष्टीनेही अत्यंत चिंताजनक आहे.
या मोकाट जनावरांबाबत नगर परिषद प्रशासनाकडून त्वरित उपाययोजना व्हावी, अशी सर्वसामान्य नागरिक, पालक व विद्यार्थ्यांची मागणी आहे.
लहान-सहान अपघात नित्याचेच
रस्त्याच्या मध्यभागी मोकाट जनावरे बसत असल्याने वाहनचालकांचे लहान-सहान अपघात नित्याचे झाले आहेत. या जनावरांमुळे वाहनचालकांत वाद सुद्धा होतो. यावर तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
लोकप्रितिनिधींनी फिरवली पाठ
मोकाट जनावरांच्या प्रश्नाकडे नगर परिषदेतील सत्ताधारी तसेच विरोधकांनीसुद्धा सपशेल पाठ फिरवल्याचे चित्र सध्या दिसत आहे. याबाबत अद्याप प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरवली का, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.