बुलढाणा,
sanjay-gaikwad : गाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत सुंदरखेडच्या वतीने जनसुविधा योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या दोन कचरा संकलन घंटागाड्यांचे लोकार्पण दि. २४ जुलै रोजी आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. गावातील घरोघरी नियमित कचरा संकलन करून स्वच्छतेला अधिक चालना मिळावी, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी आणि सुंदरखेड गाव स्वच्छता अभियानात आदर्श ठरावे, या उद्देशाने या घंटागाड्या ग्रामपंचायतीला उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यावेळी आ. संजय गायकवाड यांनी स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत, ग्रामस्थांनी ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीतच टाकावा तसेच गाव स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी सक्रिय सहकार्य करावे असे आवाहन केले.
या लोकार्पण सोहळ्याला शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, सरपंच अपर्णा चव्हाण, अरुण शिरसाठ, विजय ईल्लकर, अनंता लहासे, राजेश काळवाघे, सुनील गवई, विनोद तळेकर, शिवा वंतरम, शुभम पर्हाड यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.