वेध,
रेवती जोशी-अंधारे,
fire-trend : सोशल मीडियाच्या काळात दररोज जगण्याचे नवनवे ट्रेंड व्हायरल होतात आणि चर्चा सुरू होते. उद्याचा दिवस कोणी पाहिला? म्हणून आजचा दिवस तुमच्या हातात आहे तो भरभरून जगून घ्या, हा विचार समाजात विशेषत: कोरोनानंतर जास्त स्थिरावला. ‘सातच्या आत घरात’चा ट्रेंड कालबाह्य ठरून, ‘वर्क हार्ड, पार्टी हार्डर’ स्वीकारून वेगळाच ट्रेंड आपण रुजवला. त्यात खाण्यापिण्यापासून गॅझेट्सपर्यंत अनेक गोष्टींचे ट्रेंड येत-जात राहिले आणि एन्जॉयमेंटच्या साच्यात आपण त्यांना घडवत राहिलो. ‘श्यामच्या आई’ची काटकसर तर ‘जेन झी’ने पुस्तकातही कदाचितच वाचली असेल. मुळात आपण भविष्याची तरतूद करून ठेवणाऱ्या कष्टाळू मुंग्यांना आदर्श मानणारे! पोटाला चिमटा काढून उद्याची सोय करून ठेवायची, उत्पन्नातून लहानशी का होईना पण बचत करण्याची आपली संस्कृती! पण, पाश्चिमात्यांनी सांगितल्याशिवाय कुठलीच गोष्ट आपल्या गळ्याखाली उतरत नाही. या न्यायाने सध्याच्या ‘फायर ट्रेंड’चा वेध घेऊ या!
सौजन्य: एआय फोटो
‘फायनान्शियली इंडिपेन्डन्ट, रिटायर अर्ली’ एफआयआरई म्हणजे फायर! प्रचंड कष्ट, वेळप्रसंगी दोन-तीन ठिकाणी कामं करून पैसा कमवायचा. मात्र, ‘पार्टी हार्डर’ न करता उत्पन्नाचा जास्तीत जास्त भाग निवृत्तीनंतरची तरतूद म्हणून गुंतवायचा. यासाठी, कल्पनेपलीकडची काटकसर करायची. आपल्या निवृत्तीची सोय झाली, असं वाटण्याइतके पैसे गुंतवले की निवृत्ती घ्यायची. समाधानकारक जीवनमान असलेल्या लहान देशांमध्ये स्थलांतरित व्हायचं, शेती करायची, गाई-म्हशी पाळायच्या आणि शांत जीवन आनंदाने जगायचं. मात्र, ही निवृत्ती साधारण चाळिशीतच घेण्याची तयारी ठेवायची. हा आहे सध्याचा ‘फायर ट्रेंड’! मागच्या शतकात जन्मलेल्या आणि आज ज्यांना ‘मिलेनियल’ म्हटलं जातं त्या पिढीला कदाचित यात काहीच नवीन वाटणार नाही. कारण खूप कष्ट आणि काटकसर करून जीवन जगायचं, उधळपट्टी हा गुन्हा आहे, खूपच आवश्यक असेल तरच खर्च करायचे हे तर त्यांच्या जीवनाचे मूलभूत नियम होते आणि आहेत.
युरोपियन देशांमध्ये गेल्या दशकभरात सुरू झालेल्या फायर ट्रेंडचे लोण आपल्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. हॉटेलिंग करायचे नाही, घरी स्वयंपाक करून कामावर जाताना सोबत डबा न्यायचा, विविध डिस्काऊंट कुपन्सचा कल्पकतेने वापर करायचा आणि हे सगळे उपाय करून उरणारी रक्कम गुंतवायची. गुंतवणुकीच्या पैशांवर उरलेले आयुष्य निवांत घालवायचे. असा हिशेब मांडताना आजारपण, अपघात आणि महागाईची संकल्पना लक्षात ठेवून नियोजन करण्याचा संदेश फायर चळवळीतील जाणते देतात.
ही एक जागतिक चळवळ असून ठिकठिकाणी या चळवळीच्या समर्थकांचे गट आहेत. नव्याने फायर अंमलात आणणाऱ्यांना, आधीपासून कार्यरत मंडळी उपयोगी टिप्स देतात. त्यात बचतीचे नवनवे पर्याय, चांगला परतावा देणारी गुंतवणूक, शेती-घर खरेदीतील बारकावे यांचा समावेश होतो. काही वित्तीय कंपन्या तर दरमहा मार्गदर्शिकाही प्रकाशित करतात. दुसरीकडे, उशिरा लग्न आणि अपत्यांचे संगोपन, महागाई, घरांच्या वाढत्या किमती आणि कर्जाच्या बोझ्यामुळे भविष्यासाठीच्या गुंतवणुकीचे प्रमाण कमी झाले आहे. निवृत्तीचे वयही पुरुषांमध्ये ६४.८ आणि त्यापेक्षा जास्त तर महिलांमध्ये ६३.३ पेक्षा जास्त नोंदविण्यात आलं आहे. वाढीव गुंतवणूक करून, लवकर निवृत्ती घेण्याचा विचारही करणे शक्य नाही. उत्पन्न मर्यादित असल्याने गुंतवणुकीवर बंधने आहेत. वित्तीय कंपन्यांच्या मते, बहुतांश ग्राहकांचं लक्ष काम आणि वैयक्तिक आयुष्यात अधिक चांगला समतोल साधण्यावर असतं. त्यामुळे निवृत्ती घेण्याची घाई करण्याऐवजी अर्थपूर्ण व्यावसायिक कारकीर्द आणि आपल्या आर्थिक क्षमतेनुसार जीवनशैलीचा समतोल साधण्यावर ते भर देतात. तुम्ही लवकर निवृत्त झालात पण, तुमचं सामाजिक वर्तुळ, चांगलं आरोग्य किंवा अर्थपूर्ण ध्येय नसेल, तर केवळ लवकर निवृत्तीचं ध्येय खरंच योग्य ठरतं का? निवृत्तीचं उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करतानाच आयुष्याचाही आनंद कसा घेता घेईल, असा सुवर्णमध्य युवा शोधत आहेत. चळवळीचे समर्थक आजही पराकोटीच्या काटकसरीलाच लवकर निवृत्तीचा मुख्य मार्ग मानतात.
चळवळीतील काही तत्त्वं खरोखर उपयुक्त आहेत आणि त्यांचा अवलंब केल्यास अगदी चाळिशीत नाही तरी पन्नाशीत निवृत्ती घेणं शक्य होऊ शकतं. लहान वयापासून बचत सुरू करणं आणि प्रत्येक वेतनवाढीनंतर निवृत्तीसाठीची बचत वाढवणं, असा लवचीक मार्ग अवलंबिता येईल. समतोल दृष्टिकोन स्वीकारल्यास मनावर अनावश्यक ताण न घेता, तुम्हाला हवी तशी आणि हवी त्या वेळी निवृत्ती घेणं शक्य होतं. त्यासाठी कोणत्याही ट्रेंडची नाही तर अधिक संतुलित आणि वास्तववादी दृष्टिकोनाची गरज आहे.
९२२३७००२७७