पोलिसांच्या सकारात्मकतेने संविधान चौकातील तणाव निवळला

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
नागपूर,
samvidhan chowk नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संविधान चौकात तणावाचे वळण मिळाले. पूर्वपरवानगी न घेता आंदोलन करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी ७० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे आकडा वाढण्याची शक्यता आहे.
 
 
samvidhan chowk
 
रोज निर्माण होत असलेली तणावाची परिस्थिती पाहता पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक कलम ५३ आणि ५४ लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रकरणात सदर व गणेशपेठ पोलिसांनी बुधवारी काही जणांवर गुन्हे दाखल केले होते. दरम्यान चिटणीस पार्क चौक रस्त्यावर भारतीय जनता युवा मोर्चानेही काँग्रेसविरोधात आंदोलन केल्याने गणेशपेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केले. वंचित विकास आघाडीनेही परवानगी नसताना संविधान चौकात गुरुवारी केलेल्या आंदोलनामुळे गोंधळ उडाला. आंदोलनात काही जणांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. आंदोलक पोलिस वाहनांसमोर झोपल्याने १५०हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले.
 
वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या 'महाराष्ट्र बंद'च्या हाकेनंतर सकाळपासूनच कार्यकर्ते संविधान चौकात जमले. त्यांनी केंद्र सरकारविरोधात निदर्शने सुरू केली. पोलिसांनी सकाळी ३० हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दुपारी काही विद्यार्थी नाईक महाविद्यालयासमोर वाहतूक अडवण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे पोलिसांनी तिथेही काही जणांना ताब्यात घेतले.