अजब लग्न! तीन युट्युबर बहिणींनी कॅमेरामॅनशी मांडला संसार

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
अमरोहा,
three sisters married their cameramen उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अनोखे लग्न चर्चेचा विषय ठरले आहे. धौरिया गावातील तीन युट्युबर बहिणींनी त्यांच्यासाठी कॅमेरामॅन म्हणून काम करणाऱ्या विकास उर्फ विकी याच्याशी १७ जुलै रोजी मंदिरात लग्न केल्याचा दावा केला आहे. या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले.

three sisters married their cameramen 
 
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विकास या तिन्ही महिलांसोबत विवाहविधी करताना आणि त्यांच्या कपाळावर कुंकू लावताना दिसत आहे. लग्नानंतर चौघांनीही एकत्रितपणे व्हिडिओ बनवत आपल्या निर्णयाबाबत माहिती दिली. लहानपणापासून एकत्र राहण्याची शपथ घेतली असल्याने एकमेकींपासून दूर राहणे आपल्याला शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
या तिन्ही महिलांनी विकाससोबत लग्न करण्याचा निर्णय परस्पर संमतीने घेतल्याचे सांगितले. समाज काय म्हणेल याची पर्वा नसल्याचे सांगताना त्यांनी राजा दशरथाच्या तीन राण्यांचा दाखलाही दिला. त्यामुळे त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
 
विकासशी लग्न करणाऱ्या तिघींमध्ये दोन सख्ख्या बहिणी आहेत, तर तिसरी जवळच्या गावात राहणारी त्यांची चुलत बहीण आहे. त्यापैकी एक जण बीएचे शिक्षण घेत असून, अन्य दोन जणी इंटरमिजिएटचे शिक्षण घेत आहेत. विकासही बीएचा विद्यार्थी असून, तो त्याच गावातील रहिवासी आहे. या चौघांनी ‘एके १९९०’ या नावाने यूट्युब चॅनल सुरू केले आहे. या चॅनलला अनेक चाहते असून, विकास त्यांच्यासाठी कॅमेरामॅन म्हणून काम करतो. याच ओळखीतून त्यांच्यात जवळीक निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
 
प्रकरण समोर आल्यानंतर हसनपूर पोलिसांनी सरोज, सावित्री, संतोष आणि विकास या चौघांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली. पोलिसांनी त्यांच्या सज्ञान असण्याबाबतची माहितीही तपासली. चौघांनीही हा निर्णय परस्पर संमतीने घेतल्याचे सांगितले. सध्या या प्रकरणी कोणाकडूनही पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र, तीन बहिणींनी एकाच पुरुषाशी केलेल्या विवाहामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि समाजातील काही सदस्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात आहे.