इराण अमेरिकेवर डोईजड

तेराव्या दिवशीही संघर्ष कायम, आखाती देशातील लष्करी तळांवर बॉम्ब वर्षावर

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
दुबई,
us iran war अमेरिका-इराणमधील संघर्ष विराम संपुष्टात आल्यापासून दोन्ही देशांचे परस्परांवर हल्ले सुरूच आहेत. संघर्षाच्या तेराव्या दिवशी दोन्ही बाजूने हल्ल्याची तीव्रता वाढली असली तरी, यात इराण अमेरिकेवर वरचढ असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेला प्रत्युत्तर देताना इराणच्या इस्लामिक रिल्हाल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी)आखाती देशातील अमेरिकेच्या लष्करी आणि हवाई तळांवरील हल्ल्याची तीव्रता वाढवली. शुक्रवारी इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर आयआरजीसीने जोरदार हल्ले चढवले. यात अनेक तळ आणि निवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या.
 
 
us iran war
 
आयआरजीसीने उत्तर इराकमधील इरबिल शहरात अमेरिकी सैन्याच्या तळावर अनेक क्षेपणास्त्रांचा मारा केला. निवासी इमारती आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर झालेल्या हल्ल्यात १८ नागरिकांचा मृत्यू तर, ३५ लोक जखमी असल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिली. इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत अमेरिकेच्या सैन्याने राजधानी तेहरानसह १३ शहरांवर हवाई हल्ले चढवले. यात चार इराणी नागरिका ठार झाले, तर नऊ जखमी असल्याची माहिती आयआरजीसीच्या प्रवक्त्याने दिली. इराणने इराकसह बहरीन, कुवेतमध्ये बॉम्बचा मारा केला. यात पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.
 
बहरीन, जॉर्डनवर हल्ले
इराणच्या लष्कराने बहरीन आणि जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळांवर ड्रोन हल्ल्यांचा दावा केला. त्यांनी म्हटले की, बहरीनच्या शेख ईसा हवाई तळावरील इंधन साठवण टाक्या, उपकरणांची गोदामे आणि निवासस्थानांना लक्ष्य करण्यात आले. जॉर्डनच्या मुवफ्फाक साल्टी हवाई तळावरील विमान हँगर्स आणि देखभाल सुविधांवरही हल्ला करण्यात आला. इराणने इशारा दिला की, त्यांच्या हितांविरुद्ध कोणतीही कारवाई केल्यास प्रादेशिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होईल.
  
संघर्षात आतापर्यंत ५५ ठार
अमेरिकी लष्कर इराणवर हवाई हल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये अहवाज, रामशीर आणि शालमचेहसह अनेक इराणी शहरांवर अमेरिकेची क्षेपणास्त्रे आदळली. इराणच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, २७ जूनपासून या हल्ल्यांमध्ये ५५ जण ठार आणि ६२९ जण जखमी झाले आहेत. या युद्धाचा परिणाम आखाती देशांवरही होत आहे. नुकताच कुवेतच्या सीमेवर ड्रोन हल्ला झाला, जॉर्डनने आपल्या हवाई हद्दीत अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट केले, आणि बहरीनमध्ये धोक्याचे सायरन वाजवण्यात आले.
होर्मुझची सुरक्षा आमची जबाबदारी
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) म्हटले आहे की, प्रादेशिक सागरी हद्दीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि नागरी खलाशांना धमकावण्याची इराणची क्षमता कमकुवत करणे, हा या हल्ल्यांचा उद्देश होता. अमेरिकेने म्हटले आहे की, ते होर्मुझच्या सामुद्रधुनीतील आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीची सुरक्षा आणि सामान्यता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
हुथीला किंमच चुकवावी लागेल : ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, जहाजांवरील हल्ले सुरूच राहिल्यास, हुथी बंडखोरांना कठोर शिक्षा दिली जाईल. भविष्यात असे हल्ले पुन्हा झाल्यास, अमेरिका थेट इराणला जबाबदार धरेल. कारण हुथी संघटना इराणच्या पाठिंब्याने काम करते. इराण आणि हुथी या दोघांनाही गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.