अर्धशतक ठोकताच वैभवचा खास जल्लोष

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
हरारे,
vaibhavs special celebration झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. झिम्बाब्वेने दिलेले १२६ धावांचे लक्ष्य भारताने अवघ्या १३.२ षटकांत पूर्ण केले. या विजयात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वैभवने अवघ्या १९ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले.
 
vaibhavs special celebration
 
या शानदार खेळीनंतर वैभवने केलेल्या खास सेलिब्रेशनचीही चांगलीच चर्चा झाली. त्याच्या या जल्लोषामागील कारण त्याने भारतीय फलंदाज रिंकू सिंगसोबतच्या संवादात उघड केले. बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये वैभवने सांगितले की, त्याचा पहिला जल्लोष त्याने आपल्या वडिलांना समर्पित केला. त्यानंतर केलेला जल्लोष त्याच्या आईसाठी होता. याबाबत त्याने रिंकू सिंगसोबत आधीच चर्चा केली होती.
 
आपल्या या खेळीचे श्रेय वैभवने केवळ आई-वडिलांनाच नाही, तर संपूर्ण कुटुंब, प्रशिक्षक आणि कठीण काळात साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दिले. आपल्या क्रिकेट प्रवासात चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात ज्यांनी पाठिंबा दिला, त्या सर्वांसाठी ही खेळी खास असल्याचे त्याने सांगितले.
 
आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतरच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये वैभवला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, पहिल्याच सामन्यात १९ चेंडूंत अर्धशतक ठोकत त्याने टीकाकारांना दमदार उत्तर दिले.
 
आपल्या मानसिकतेबद्दल बोलताना वैभवने आपण कोणतीही गोष्ट गृहीत धरत नसल्याचे स्पष्ट केले. आपण कुठेही खेळत असलो तरी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो आणि संघासाठी योगदान देण्यावर आपला भर असतो, असे त्याने सांगितले.
 
हरारेच्या मैदानाबद्दलही वैभवने आपली पसंती व्यक्त केली. काही मैदानांवर धावा करणे फलंदाजांना विशेष आनंददायी वाटते आणि हरारेचे मैदानही त्यापैकीच एक असल्याचे त्याने म्हटले.