तभा इफेट
मानोरा,
vitholi zilla parishad school कृषी व औद्योगिक क्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी ज्या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले, त्या विठोली येथील शाळेच्या वर्गखोलीचे ‘स्मार्ट’ रूप समोर आले आहे.

मोडकळीस आलेल्या इमारतीचा बाह्यभागच नव्हे, तर आतील वर्गखोल्याही ‘तांडा वस्ती सुधार’ योजनेतून अद्यावत झाल्या आहेत. लाकडी कौलारू छत कायम ठेवून भिंतींना नव्याने रंगरंगोटी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी निळ्या रंगाचे नवीन बेंच-डेस्क, भिंतीवर डिजिटल टीव्ही स्क्रीन, काळा फळा, भिंतीवर घड्याळ व पंख्याची सुविधा आहे. बेंचवर विद्यार्थ्यांच्या दप्तरे, पाण्याच्या बाटल्या दिसत असून, वर्गात शिक्षणपूरक वातावरण तयार झाले आहे. फळ्यावर इंग्रजी शब्द लिहिले असून, पटसंख्येची सुद्धा नोंद आहे. गतवर्षीच्या जुलै महिन्यात ही शाळा इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे वृत्त दैनिक तरुण भारत ने प्रकाशित केले होते. पावसाळ्यात गळती, तुटलेले बेंच व असुविधांमुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता. सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनी आवाज उठवल्यानंतर शासनाच्या ‘तांडा वस्ती सुधार योजने’तून निधी मंजूर झाल्याने डिजिटल वर्गखोली, फर्निचर व इतर भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या. शाळेचा जुना ऐतिहासिक ढाचा कायम ठेवून आतील सुविधा आधुनिक केल्या आहेत.
कै.वसंतराव नाईकांच्या शाळेत शिकतो, याचा मुलांना अभिमान वाटतो. डिजिटल स्क्रीनमुळे शिक्षण अधिक प्रभावी झाले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्याध्याप लोंढे यांनी दिली. शाळा ‘स्मार्ट’ झाल्याने परिसरातील पालकांचा कल आता जिल्हा परिषद शाळेकडे वाढत असून पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग असणार्या या शाळेत तब्बल सातशे विद्यार्थी सध्या ज्ञानार्जन करीत आहेत. महामार्गावरून शाळेची बाह्य इमारत व आतील सुविधा पाहून अनेकजण कौतुक करत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे उद्दिष्ट विठोली येथे प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहे.