वाशीम,
yogesh kumbhejkar मतदार यादीत नाव असले तरी प्रत्येक मतदाराने ई.एफ. फॉर्म भरून देणे अत्यावश्यक आहे. पात्र मतदारांचा मतदानाचा हक्क अबाधित राहण्यासाठी तसेच अचूक व अद्ययावत मतदार यादी तयार करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी, बूथस्तरीय प्रतिनिधींनी आणि नागरिकांनी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एस.आय.आर.)-२०२६ मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी विरेंद्र जाधव, नायब तहसीलदार सदाशिव पढवे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष आकाश लोलप, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उज्वल देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन गोटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय खानझोडे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय रणखांब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष पवन राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी पुढे बोलतांना सांगितले की, मतदारांनी ई.एफ. फॉर्म भरून आवश्यक माहिती सादर करावी. हा फॉर्म संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे प्रत्यक्ष भरून देता येणारच आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ८ ऑगस्टपर्यंत गृहभेटी व मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण पूर्ण करण्यात येणार असून, १७ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. त्यावरील कार्यवाही पूर्ण करून १९ ऑटोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.जिल्ह्यात एकूण १० लाख १९ हजार ५१९ मतदार असून त्यापैकी ९ लाख ७२ हजार ३० गणनापत्रकांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे. तसेच ७ लाख १५ हजार १७४ गणनापत्रके मतदारांना वितरित करण्यात आली आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय पाहता रिसोड मतदारसंघात ९७.२६ टक्के, वाशीम मतदारसंघात ९२.११ टक्के, तर कारंजा मतदारसंघात ९७.२२ टक्के गणनापत्रकांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे. तालुकानिहाय आढाव्यात मालेगाव, कारंजा, मानोरा, रिसोड, मंगरुळनाथ आणि वाशीम तालुयांमध्येही कामाला गती देण्यात आली असून उर्वरित पात्र मतदारांपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
यावेळी मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरण व पुनर्रचनेसंदर्भातील प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. हे प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार असल्याने, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आवश्यक माहिती देण्यात आली. तसेच या प्रस्तावांबाबत काही सूचना अथवा हरकती असल्यास त्या प्रशासनाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.यासंदर्भात संबंधित पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. पाहणीअंती आवश्यकतेनुसार सुधारणा प्रस्तावित करून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.