सावकारी पाश विनाशी, विठ्ठलाच्या नावाची भिशी!

छोट्याश्या गावातील वारकऱ्यांची ५० लाखांची उलाढाल

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
कोल्हापूर
vitthal bhishi भिशी म्हणजे एक पठडीबाज संकल्पना आपल्या डोक्यात असते पण एका छोट्याश्या गावातील भिशी खूप वेगळी आहे, ती वारकरी संप्रदायाचे सत्व आणि नैतिकता देखील कशी जपावी हे शिकवते. ‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे’ या वचनाचे प्रात्यक्षिक म्हणजे येथे गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली कोल्हापूर जिल्ह्याच्या बस्तवडे गावाची ‘विठ्ठल भिशी’. इतके कायदे, नियम असताना देखील केवळ विठ्ठल हाच विश्वास, तोच जामीन, ‘कारण अन् तारण’ या तत्वावर जणू ही भिशी २८ वर्षांपासून सुरू आहे. १८ हजारापासून सुरू झालेली भिशी आता 50 लाखांवर पोहचली आहे.१९९७ साली सुरू झालेली ही भिशी केवळ 950 रुपयांच्या खर्चात आता ५० लाखांची बचत होत असून सभासद वारकèयांच्या शेतीच्या कामांना अवजारे आणि बी-बियाणे खरेदीसाठीही हातभार लागत आहे.

vithhal
 
 
vitthal bhishi महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात बस्तवडे ता. कागल या दोन हजार लोकसंख्येच्या छोट्याशा गावात विठ्ठल भक्तांनी वारकरी भक्ती परंपरा जोपासतानाच अर्थकारणात उभे केलेले कार्य खूप मोठे, अविश्वसनीय आणि अनुकरणीय असेच आहे. गावातील संतसाहित्याचे अभ्यासक आदर्श मुख्याध्यापक आणि आता ९२ वय असणारे ह.भ.प. पां. रा. पाटील गुरुजी यांनी या विठ्ठल भिशीची स्थापना केली. आजही कोणत्याही कागदपत्र आणि स्टँपशिवाय भिशी कशी चालू शकते, या बचतीतून गरजूंना सावकारी पाशातून कशी मुक्त करू शकते हे दाखवून दिले.
 
vitthal bhishi प्रत्येक एकादशीला भिशीच्या सभासदांनी मंदिरात येऊन प्रवचन ऐकूनच भिशी भरायची. दुसाऱ्या दिवशी हे साठलेले पैसे कर्ज म्हणून सभासदांना वितरीत केले जातात. असे वितरीत केलेले कर्ज हे ‘अश्विन वद्य’ एकादशीच्या आत शंभर टक्के वसूल होतेच तेही फिरवाफिरवीशिवाय! या भिशीचे सत्व, नैतिकता आणि स्वयंशिस्त इतकी की गेल्या २५ वर्षात एकही रुपयाचे कर्ज कधी थकलेले नाही. भिशी दरवर्षी फुटते ती कार्तिक शुद्ध एकादशीच्या अगोदर म्हणजे कार्तिक वारीला लोकांना पंढरपूरला जायला पैसे मिळावेत हा उद्देश स्थापनेमागे होता. पण आता त्यापुढे खूप मोठी आर्थिक उलाढाल या भिशीत होते. पहिल्या वर्षी १८ हजार इतकी भिशी होती तर २५ व्या वर्षी ती ५० लाखांवर पोहचली आहे. दरवर्षी पंढरीची वारी करणाèया वारकèयांना याचा फायदा होतो, याचं समाधान असल्याची भावना संस्थापक पाटील गुरूजी यांनी व्यक्त केली.
vitthal bhishi कर्जदाराने कर्जमागणी करताना साधा 50 पैशाचा कागद घेवून अर्जसुद्धा करायचा नाही. केवळ तोंडी मागणी करायची. कर्जदार, एक सभासद जामीनदार अशा दोन सहींवर एक हजार ते दीड-दोन लाखाचे कर्ज दिले जाते. यासाठी शेअर कटींग किंवा स्टँप कागद नाही की काही तारणही नाही. अशाप्रकारे वर्षाला ४० ते ४२ लाख कर्जवाटप होते.
कमी व्यवस्थापन खर्च
vitthal bhishi खूप कमी व्यवस्थापन खर्च हेही या भिशीचे वैशिष्ट्य आहे. 40 लाखांच्या भिशीच्या व्यवस्थापनाचा खर्च आहे फक्त ९५० रुपये. यामध्ये-भिशी रजिस्टर-१४० रुपये भिशीपत्रके टायपिंग आणि झेरॉक्स 100 रुपये, प्रवास खर्च ५५० रुपये, मोबाईल रिचार्ज १४१  रुपये, कॅलक्युलेटर सेल १२ रुपये तर व्यवस्थापकाचे मानधन वार्षिक सात रुपये आहे. हा सर्व व्यवहार फक्त एका रजिस्टरमध्येच होतो. यासाठी दुसरी कोणतीही वही नाही. नाही. सध्या सभासद संख्या १०२ इतकी आहे. जातीधर्माच्या पलिकडे जसे खुल्या प्रवर्गातील सभासद आहेत तसे नुरूल्ला पठाण नावाचा मुस्लीम आणि या गावचा नसतानाही अनिल शिंदे हा केशकर्तनालय चालवणारा विठ्ठल भक्तही सभासद आहे.

शेती अवजारे, बी-बियाणे खरेदीसाठी लागतो हातभार
vitthal bhishi बा विठ्ठलाच्या नावावर चालणाèया या बचत भिशीत सर्वजण आपुलकीने सहभागी होतात, खरंतर ही अभूतपूर्व बचत अनेक वारकèयांना अगदी अडचणीच्या काळात हातभार लावते. वर्षभर चालणाèया अनेक कार्यक्रमात गावातील सर्वधर्मीय वैष्णव सहभागी होतात. या भिशीतून येणाèया पैशातून शेती आणि अवजारे, बी-बियाणे खरेदीसाठी मदत होते. विशेष म्हणजे प्रत्येक व्यवस्थापकाने वार्षिक केवळ सात रुपये मानधन घेऊन ही सेवा केली आहे. इथे प्रत्येकाला एकच नैतिकता आहे आणि ती म्हणजे विठुनामाची. त्या सावळ्याच्या भक्तिपोटी कोणाच्या मनात लाखो रुपयांच्या उलाढालीतही काही काळेबेरे येत नाही, हाच मोठा महिमा आहे.