पुणे
marathi sahitya sammelan शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांच्या नावाची घोषणा ५ ऑक्टोबर रोजी होणार असून, प्रख्यात अनुवादक उमा कुलकर्णी, कादंबरीकार शरणकुमार लिंबाळे, लेखक आनंद हर्डीकर, ज्येष्ठ विचारवंत शेषराव मोरे यांच्यासह एकूण आठ साहित्यिकांची नावे सध्या चर्चेत आहेत. गोव्यात ३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने होणाऱ्या बैठकीत ५ ऑक्टोबर रोजी संमेलनाध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती महामंडळाचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी दिली.
शंभरावे साहित्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद या संमेलनाचे आयोजन करणार असून संमेलनाच्या आयोजनाशी संबंधित स्थळ, संयोजन समिती आणि अन्य महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, आता संमेलनाध्यक्ष आणि स्वागताध्यक्षांच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्राप्त अनुवादक चंद्रकांत भोंजाळ, प्रख्यात कवी प्रवीण दवणे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त अनुवादक अनुराधा पाटील, लेखक विचारवंत रमेश पतंगे यांच्याही नावांची चर्चा आहे. पुढील तीन महिन्यांत आणखी काही नावांचा विचार होण्याची शक्यता आहे. यंदा महाराष्ट्र साहित्य परिषदेत सत्ताबदल झाला असून महामंडळावरही नवी कार्यकारणी आली आहे. सत्ताबदल झाल्याने काही साहित्यिकांचा अध्यक्षपदाचा मान हुकला, अशा चर्चाही साहित्यक्षेत्रात रंगली आहे.
विचारविनिमयानंतरच अध्यक्षांची निवड
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड पूर्वी निवडणूक प्रक्रियेद्वारे केली जात होती. मात्र, ९५व्या संमेलनापासून ही पद्धत बदलण्यात आली आहे. आता महामंडळाच्या कार्यकारणीच्या बैठकीत संभाव्य नावांची चर्चा केली जाते. त्यानंतर पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये विचारविनिमय होऊन संमेलनाध्यक्षांची निवड केली जाते.
यंदा अनुवादक होणार का संमेलनाध्यक्ष?
गेल्या ९९ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये एकाही अनुवादकाला संमेलनाध्यक्षपद मिळालेले नाही. मागील वर्षी हा मुद्दा उपस्थित करून अनुवादक चंद्रकांत भोंजाळ यांना अध्यक्षपद देण्याची मागणी करण्यात आली होती. यंदाही त्यांचे नाव चर्चेत आहे. त्याचबरोबर प्रख्यात अनुवादक उमा कुलकर्णी यांचे नावही अध्यक्षपदासाठी पुढे आले आहे. त्यामुळे यंदा अनुवादकाला संमेलनाध्यक्षपदाचा मान मिळणार का, याची उत्सुकता आहे.