महिलांनी सायबर पाठलागाकडे दुर्लक्ष न करता वेळेत तक्रार करावी : विजया रहाटकर

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
पुणे,
vijaya rahatkar महिलांचा पाठलाग आणि सायबर पाठलाग हा दंडनीय गुन्हा आहे. शारीरिक हल्ला झाला नसला तरी विनाकारण संपर्क साधणे, पाठलाग करणे किंवा डिजिटल माध्यमातून छळ करणे याबाबत तक्रार दाखल करता येते. त्यामुळे महिलांनी अशा घटनांकडे दुर्लक्ष न करता वेळेत तक्रार दाखल करावी, असे आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.यशदा येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्या वतीने पाठलाग आणि सायबर पाठलाग प्रतिबंधाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्या बोलत होत्या.
 
 
women should report cyber stalking without ignoring it says vijaya rahatkar
विजया रहाटकर म्हणाल्या, महिलांची सुरक्षा, सन्मान आणि स्वातंत्र्य ही सामूहिक जबाबदारी आहे. महिलांनी आणि मुलींनी अशा समस्यांबाबत कुटुंबीयांशी मोकळेपणाने संवाद साधावा. पाठलागासारख्या घटनांकडे दुर्लक्ष न करता संघटितपणे त्याचा सामना करणे आवश्यक आहे.
 
 
भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८ नुसार पाठलाग आणि सायबर पाठलाग हा गुन्हा आहे. महिलांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाणे आवश्यक नाही. झिरो एफआयआर दाखल करता येतो. तसेच सूर्यास्तानंतर महिलांना पोलीस ठाण्यात बोलावण्यावर कायदेशीर मर्यादा आहेत. महिलांचा जबाब महिला पोलीस अधिकाऱ्यासमोर नोंदविला गेला पाहिजे, अशी माहितीही रहाटकर यांनी दिली.
महिलांच्या सुरक्षेसाठी पॉश आणि पॉक्सोसह विविध कायदे आहेत. या कायद्यांची माहिती सर्व स्तरांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तसेच शासकीय आणि खासगी संस्थांमध्ये प्रभावी तक्रार निवारण यंत्रणेचे संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवाडे, शहर व सत्र दिवाणी न्यायालय मुंबईचे तदर्थ जिल्हा न्यायाधीश प्रविण कुंभोजकर, यशदाचे उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, मुंबई ग्लोबल फाऊंडेशनचे रिझवान शेख, ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या संचालक डॉ. अनघा लवळेकर आदी उपस्थित होते.