तभा वृत्तसेवा
महागाव,
pratibha-dhanorkar : यवतमाळ आर्णी हिवरा माहूर किनवट आदिलाबाद रेल्वे मार्ग निर्माण करण्यात यावा याकरिता शासन दरबारी पाठपुरावा करू, असे प्रतिपादन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दत्तशिखर येथे रेल्वे कृती समितीच्या बैठकीत केले. रेल्वे कृती समितीच्या वतीने श्री दत्त शिखर संस्थान येथे विचारविनिमय सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या.
यावेळी आमदार किसन वानखेडे, आमदार राजू तोडसाम, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, प्रकाश देवसरकर, विजय खडसे, नामदेव ससाने, शिवाजी राठोड, साहेबराव हिवरेकर, माहूर नगर पंचायत अध्यक्ष फिरोज डोसानी, केने महाराज, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आरिफ बेग, डीबी नाईक, अर्जुन आडे, दीपक आडे, जगदीश नरवाडे, प्रदीप नरवाडे, बेबी प्रदीप नाईक, समाधान जाधव, अर्चित नाईक उपस्थित होते.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकèयांना तेलंगण राज्यात आपला शेतमाल विक्रीसाठी नेता यावा, तसेच भगवान दत्तप्रभू यांचे जन्मस्थान, महासती अनसूयामाता, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक माता रेणुका, प्राचीन पांडव लेण्या, दत्त प्रभूंचे निद्रस्थान देवदेवेश्वर, अष्ठादश शक्तीपीठांपैकी आठवे शक्तीपीठ श्री एकविरा देवी संस्थान यांसारख्या ठिकाणी देशभरातील भाविक सोयीसाठी हा मार्ग व्हायला हवा आहे.
तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शहरात जाण्यासाठी हा रेल्वे मार्ग निर्माण करण्यात यावा, याकरिता आपण रेल्वे कृती समिती सोबत असून हा मार्ग होण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन खा. प्रतिभा धानोरकर यांनी केले. प्रास्ताविक किशोर रावते, संचालन मुकुंद पांडे, तर आभारप्रदर्शन सुरेश पवार यांनी केले.