गोंदिया
farmers-loan-waiver-scheme राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026’ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील कर्जमुक्तीच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे. योजनेअंतर्गत पात्र शेतकर्यांच्या नावांच्या एकूण 558 याद्या संबंधित बँकांकडून प्राप्त झाल्या असून, शनिवारी 25 जुलै रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कर्जमुक्तीचा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकर्यांनी विनाविलंब आपले आधार प्रमाणीकरण (केवायसी) पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

farmers-loan-waiver-scheme जिल्हाधिकारी मंदार पत्की आणि जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जात आहे. या याद्या संबंधित बँक शाखा, सहकारी संस्था आणि गावपातळीवरील सूचना फलकांवर नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेमध्ये पूर्ण पारदर्शकता राहावी यासाठी बँक स्तरावर 29 पंचनामे, तर संस्था व गाव पातळीवर 329 पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. दरम्यान, प्रसिद्ध झालेल्या यादीत नाव असलेल्या प्रत्येक शेतकरी बांधवाला या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. शेतकर्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यात एकूण 752 आपले सरकार सेवा केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या केंद्रांवर प्रमाणीकरणासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शक सूचना (एसओपी) देखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
विलंब केल्यास येणार अडचणी!...
farmers-loan-waiver-scheme शासनाची ही योजना शेतकर्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रशासनाकडून याची अंमलबजावणी अत्यंत वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने केली जात आहे. त्यामुळे यादीत नाव असलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी अजिबात विलंब न करता जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यात तांत्रिक अडचणी येऊ शकतात असा इशारा प्रशासनाने दिला आहे.