घोराड येथे पंढरीचा भास; विठू माऊलीचा ध्यास!

हजारो भाविक, विठुरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासून रीघ

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
सेलू,
pandhari at ghorad प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या तीर्थक्षेत्र घोराड येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुख्माईच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांचा जनसागर उसळला. माऊली... माऊली...च्या जयघोषाने मंदिर आणि बोरनदी तिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विदर्भाच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या हजारो भाविकांनी विठूरायाचे दर्शन घेत आषाढी एकादशीचा आनंद लुटला.
 
 
pandhari at ghorad
 
 
पहाटे काकड आरती व महापूजेनंतर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या घोषात आणि विठ्ठलाच्या नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. दिवसभर मंदिरात भाविकांची गर्दी होती. भाविकांच्या सोयीसाठी विविध सामाजिक संस्था, ग्रामस्थ व सेवाभावी मंडळांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून भाविकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
येथील आषाढी एकादशी उत्सव शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. पावणे दोनशे वर्षापासून संत केजाजी महाराज यांनी सुरू केलेल्या प्रथा परंपरा आजही येथे जोपासल्या जात असून सदोदित भक्तीचा झरा येथे वाहत असतो.
पंचक्रोशी प्रदक्षिणा
विठ्ठल रुख्माई देवस्थान मधून दुपारी टाळ मृदुंगाचा निनदात भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन विठू नामाचा गजर, संत केजाजी व संत नामदेव महाराज यांचा नाम घोष करीत पंचक्रोशी प्रदक्षिणेला प्रारंभ झाला.pandhari at ghorad बोर तीरावरून दिंडी जात असताना जणू चंद्रभागा तीरावरून जात असल्याचा भास भाविकांना होत होता.
१ किलो चांदीचा मुकूट अर्पण
आषाढी एकादशी निमित्ताने एका भक्ताने १ किलो चांदीचा विठ्ठल रुख्माई च्या मूर्तीला मुकुट व २० ग्राम सोन्याचे दागिने गुप्त दान करण्यात आले. पहाटे झालेल्या महापूजा व अभ्यंग स्नानाच्या वेळी मूर्तीला अर्पण करण्यात आले या वेळी असंख्य भाविक उपस्थित होते.