मुंबई
aishwarya tahckeray राजकीय क्षेत्रातील सर्वांत प्रभावशाली कुटुंबांपैकी एक असलेल्या ठाकरे कुटुंबातील सदस्य ऐश्वर्य ठाकरेने राजकारणापासून दूर राहून चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा नातू असलेल्या ऐश्वर्यने गेल्या वर्षी दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या ‘निशांची’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर आता त्याला यशराज फिल्म्स (YRF)च्या बॅनरअंतर्गत एका महत्त्वाकांक्षी चित्रपटाची ऑफर मिळाली आहे.
या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करणार असून चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. रोमँटिक अॅक्शनपट म्हणून साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटात ऐश्वर्य ठाकरेसोबत अहान पांडे, शर्वरी वाघ आणि बॉबी देओल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माता आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक अली अब्बास जफर ही जोडी पाचव्यांदा एकत्र काम करत आहे. पुढील वर्षी 26 मार्च रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
ऐश्वर्य ठाकरेची कौटुंबिक पार्श्वभूमी पूर्णपणे राजकीय आहे. त्यांचे आजोबा बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाचा महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ प्रभाव राहिला आहे. मात्र, कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेण्याऐवजी ऐश्वर्यने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासूनच त्याला कला आणि चित्रपटांविषयी विशेष आकर्षण असल्याने त्याने राजकारणाऐवजी अभिनय आणि चित्रपटसृष्टीत करिअर घडवण्याचा मार्ग निवडला.
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ऐश्वर्यने चित्रपटसृष्टीतील विविध पैलू जवळून समजून घेण्यासाठी प्रयत्न केले. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यानंतर कॅमेरासमोर येण्यापूर्वी त्याने अभिनय कौशल्य विकसित करण्यासाठी बराच काळ मेहनत घेतली. अखेर अनुराग कश्यप यांच्या ‘निशांची’ या चित्रपटातून त्याला अभिनयाची पहिली संधी मिळाली.
दरम्यान, ऐश्वर्य ठाकरेच्या चित्रपट प्रवासाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा रंगली होती. प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या अनेक स्टारकिड्सच्या तुलनेत तो सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. इन्स्टाग्रामवर त्याचे सुमारे 17 हजार फॉलोअर्स असून त्याने आतापर्यंत केवळ आठ पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यापैकी एका पोस्टमध्ये आजोबा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक खास थ्रोबॅक फोटो पाहायला मिळतो. सोशल मीडियावर कमी सक्रिय असला तरी त्याच्या टॅग करण्यात आलेल्या व्हिडीओंमधून त्याचे उत्कृष्ट नृत्यकौशल्यही दिसून येते.
चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच ऐश्वर्य ठाकरेच्या वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा झाली होती. अभिनेत्री अलाया एफसोबत त्याचे रिलेशनशिप असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, अलायाने या चर्चांचे खंडन करत ऐश्वर्य हा केवळ तिचा जवळचा मित्र असल्याचे स्पष्ट केले होते.