तू माझ्यावर प्रेम करत नाहीस…

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
मुंबई
apara mehta ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ आणि ‘जमाई राजा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अपरा मेहता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. पती आणि अभिनेते दर्शन जरीवाला यांच्यापासून वेगळं राहण्यामागचं कारण सांगताना त्यांनी आयुष्यातील एक भावनिक प्रसंग उलगडला.
 

apara mehta reveals reason behind separation from husband darshan jariwala after decades 
अपरा मेहता आणि दर्शन जरीवाला हे गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून वेगळे राहत आहेत. मात्र, त्यांचा घटस्फोट झालेला नाही. अमेरिकेत असताना दर्शन यांनी अपरा यांना फोन केला होता. लग्नाच्या वाढदिवशीच काही महत्त्वाचं बोलायचं असल्याचं सांगत त्यांनी पत्नीशी संवाद साधला होता. त्यानंतर भारतात परतल्यानंतर दर्शन यांनी विभक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती.
‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत अपरा मेहता यांनी सांगितले की, त्या अमेरिकेतील शो संपवून भारतात परतल्या होत्या. त्या मध्यरात्री 3 वाजता विमानतळावर पोहोचल्या आणि घरी पोहोचेपर्यंत पहाटेचे 5 वाजले होते. त्यानंतर अवघ्या दोन तासांनी, म्हणजे सकाळी 7 वाजता त्यांची शूटिंग शिफ्ट होती.
त्या प्रसंगाची आठवण सांगताना अपरा म्हणाल्या, “त्यांनी मला फक्त एवढंच सांगितलं की, हे पहा अपरा… आपण विभक्त होऊयात. कारण मी आता तुझ्यावर प्रेम करत नाही. मला आता तू आवडत नाहीस. तू माझ्या आयुष्यातील सर्वांत कुरूप महिला आहेस.”
अपरा यांनी पुढे सांगितले की, त्या वेळी दर्शन सकाळी चहाचा कप घेऊन झोपाळ्यावर बसले होते आणि त्या शूटिंगसाठी निघाल्या होत्या. त्या दिवशी त्यांना तीन मोठे सीन्स शूट करायचे होते. अमेरिकेहून नुकत्याच परतल्यामुळे प्रत्येक टेकच्या मधल्या वेळेत त्यांना झोप येत होती. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी विचार केला की दर्शन यांनी नेमकं काय म्हटलं होतं, कदाचित त्यांचा तसा अर्थ नसावा.
मात्र, काही काळानंतर दर्शन घर सोडून निघून गेले. अपरा यांनी स्पष्ट केले की, त्यांचा घटस्फोट झालेला नाही. आजही दोघांचे संबंध सौहार्दपूर्ण आहेत. दर्शन यांच्यासाठी त्यांच्या घराचे दरवाजे नेहमी खुले असल्याचे सांगत त्यांनी म्हटले की, “हे अजूनही आमचंच घर आहे. ते परत येऊ शकतात. पण मला हेही माहीत आहे की, कदाचित ते परत येणार नाहीत.”आपल्या नात्याबद्दल बोलताना अपरा म्हणाल्या की, त्यांना दर्शन यांच्यासारखा व्यक्ती पुन्हा भेटणार नाही आणि दर्शन यांनाही त्यांच्यासारखी व्यक्ती मिळणार नाही. दोघे वेगळे राहत असले तरी एकमेकांसोबत आजही सहज वावरतात, असेही त्यांनी सांगितले.अपरा मेहता आणि दर्शन जरीवाला यांचा विवाह 1980 मध्ये झाला होता. त्यानंतर 1981 मध्ये कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा लग्नगाठ बांधली होती. या दोघांना खुशाली नावाची मुलगी आहे. अपरा आणि दर्शन यांचा कायदेशीर घटस्फोट झालेला नसला तरी 2003-2004 पासून ते वेगळे राहत आहेत.