पंढरपूर
ashadhi ekadashi आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पहाटे पंढरपुरात मुख्यमंत्री यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा पार पडली. यावेळी “पाऊस पडू दे, पीक बहरू दे, पांडुरंगा, महाराष्ट्र समृद्ध होऊ दे,” अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी विठुरायाच्या चरणी केली.
राज्याच्या विविध भागांतही आषाढी एकादशीचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली असून, विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या रांगा लावल्या. अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये पालखी, दिंडी सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथे भक्ती आणि कलेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. कुडाळ येथील डॉ. अनिकेत निब्रे यांनी आपल्या शेतामध्ये नदीतील दगड-गोटे आणि रानफुलांचा वापर करून तब्बल 60 फुटांची भव्य विठ्ठल मूर्ती साकारली आहे. निसर्गाच्या कुशीत उभी राहिलेली ही आकर्षक कलाकृती भाविकांचे लक्ष वेधून घेत असून, पंचक्रोशीत श्रद्धा आणि कौतुकाचा विषय ठरली आहे. विठुरायाचे हे सुंदर रूप पाहण्यासाठी ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने येथे भेट देत आहेत.
पंढरपुरात आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आणि चंद्रभागा नदीत पवित्र स्नानासाठी लाखो वारकरी आणि भाविक दाखल झाले आहेत. संपूर्ण पंढरपूर नगरी विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली असून, चंद्रभागा तीर आणि प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
डोंबिवलीतही आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळाला. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात हरिओम रेल्वे प्रवासी भजन मंडळातर्फे भव्य भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गेल्या 12 वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या उपक्रमाला यंदाही वारकरी, प्रवासी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून टाळ-मृदुंग वाजवत भजनात सहभाग घेतला. विठ्ठल नामाच्या गजराने आणि अभंगांच्या सुरांनी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
नागपूर जिल्ह्यातील विविध विठ्ठल मंदिरांमध्येही पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली. निर्मल नगरीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. पहाटे काकड आरती, महापूजा आणि प्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला. पारंपरिक पूजा, रंगीबेरंगी सजावट आणि हरिनामाच्या गजरात नागपूरकरांनी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले.
रत्नागिरी शहरात आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर असा दिंडीचा मार्ग होता. भगवे झेंडे, टाळ-मृदुंगाचा गजर आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात महिला, पुरुष आणि वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. पारंपरिक वेशभूषेतील वारकऱ्यांनी शहरात भक्तिमय वातावरण निर्माण केले.
रायगड जिल्ह्यातील “धाकटी पंढरी” म्हणून प्रसिद्ध असलेल्या साजगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी झाली. पहाटेपासूनच जिल्ह्याच्या विविध भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले. “विठ्ठल… विठ्ठल…”च्या नामघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. टाळ-मृदुंगाच्या गजरात अभंग आणि भजन म्हणत वारकरी दर्शनासाठी रांगेत उभे राहिले. मंदिर प्रशासनाने दर्शनरांग, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि सुरक्षेची व्यवस्था चोख ठेवली होती. पंढरपूरला जाता न आल्याची खंत असली तरी साजगावच्या धाकट्या पंढरीत दर्शन घेण्याचे भाग्य लाभल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली.
मुंबईतील वडाळा येथील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरातही आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. पहाटे मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्या हस्ते सहकुटुंब अभिषेक पूजा पार पडली. परंपरेनुसार मुंबईच्या महापौरांना या मंदिरात पूजेचा मान दिला जातो. यावेळी त्यांचे पती राजेश तावडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
“मुंबईच्या महापौर या नात्याने वडाळ्यातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठलाची पूजा करण्याचा बहुमान मिळाल्याने मन भरून आले. सर्व मुंबईकर आणि वारकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा,” अशा भावना महापौर ऋतू तावडे यांनी व्यक्त केल्या.
राज्यभरातील या भक्तिमय सोहळ्यांमुळे आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्र विठ्ठल नामाच्या गजरात रंगून गेला आहे.