तिवसा
ashadhi-ekadashi आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर शनिवारी, २५ जुलैला श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा अविस्मरणीय संगम अनुभवायला मिळाला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते. दिवसभर पूजा, आरती, भजन, मान्यवरांच्या भेटी, पुरस्काराचा गौरव आणि महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

ashadhi-ekadashi कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६ वाजता संस्थेचे सहसचिव सत्यनारायण चांडक तसेच अमरावतीचे अप्पर पोलिस अधीक्षक यांनी सहकुटुंब विठ्ठल-रुक्मिणीची विधीवत महापूजा करून केली. यावेळी स्थानिक विश्वस्त अतुल ठाकरे व संस्थेचे व्यवस्थापक प्रशांत गावंडे उपस्थित होते. त्यानंतर सकाळी ८ वाजता काकड आरती व महाआरती झाली. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आयोजित हरिनाम भजनात वारकरी संप्रदायाच्या अभंगांनी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला. टाळ-मृदंगाच्या गजरात भाविकांनी विठ्ठलनामाचा अखंड जप करीत भक्तीचा आनंद लुटला. दुपारी १२ वाजता वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी संस्थेचे अध्यक्ष ना. बा. अमाळकर यांची विशेष मुलाखत घेतली. यामध्ये श्रीक्षेत्र कौंडण्यपूरची धार्मिक परंपरा, पालखी सोहळा आणि वारकरी संस्कृतीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी भाजपाचे रविराज देशमुख उपस्थित होते. आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे यांनीही मित्रपरिवारासह विठ्ठलाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.
ashadhi-ekadashi यावर्षी कौंडण्यपूरच्या माउली पालखीने राज्यभरात मानाचा बहुमान मिळविल्याने भाविकांमध्ये विशेष आनंद होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूर येथे ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार २०२६’ अंतर्गत प्रथम क्रमांकाचे प्रशस्तिपत्र व १ लाखाचा पुरस्कार संस्थेला प्रदान करण्यात आला. या ऐतिहासिक गौरवाच्या वेळी संस्थेचे सचिव तथा पालखी सोहळा प्रमुख सदानंद साधू आणि दिंडीचालक पंकज महाराज महल्ले उपस्थित होते. सत्यनारायण चांडक यांच्या वतीने सर्व भाविकांना फराळ व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.
संस्थेच्या वतीने गुरुवार, ३० जुलैला सायंकाळी ४ वाजता आयोजित दहीहंडी सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.