मालेगाव,
ashadi ekadashi विदर्भाची प्रती पंढरी म्हणून ओळखले जाणारे नाथनगरी डव्हा संस्थान येथे आषाढी एकादशीनिमित्त शनिवार २५ जुलै रोजी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. जय गुरू दत्तात्रय अवधुता नंगे स्वामी विश्वनाथा या जयघोषात भक्तांनी नाथांच्या चरणी नतमस्तक होत भक्तिभाव व्यक्त केला. सकाळपासूनच पायदळ दिंड्या, वारकरी, महिलावर्ग आणि ग्रामीण भागातील भाविक रस्त्यांवर मोठ्या संख्येने दिसून आले.
शहरासह तालुयातील श्री विठ्ठल-रूख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रिघ लागली होती. श्री नाथ नंगे महाराज संस्थानचे वतीने आषाढी एकादशीनिमित्त मंदिर परिसरात पंचक्रोशीतून पायदळ आलेल्या दिंडीतील वारकरी भक्तांची राहाण्याची सोय करण्यात आली होती. मंदिर परिसरात साबुदाणा उसळ, केळी व चहाचे वाटप करण्यात आले. दिंडीतील वारकर्यांच्या विठू नामा चा जय जयकाराने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. तालुयातील मालेगाव, डोंगरकिन्ही, एकांबा, जऊळका रेल्वे, सुकांडासह पंचक्रोशीतील भक्तांच्या पायदळ दिंड्या श्री नाथ नंगे महाराज संस्थानवर दर्शनासाठी आल्या होत्या.
शहरातील शिवचौकातील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविले होते. मंदिर परिसरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. येथे साबुदाण्याच्या उसळीचे वाटप करण्यात आले. केळी रस्त्यावरील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात दर्शनाचा व उसळीच्या प्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. अकोला फाट्यावरील ओंकारगीर बाबा संस्थानात श्री विठ्ठल रुख्माईच्या दर्शनाचा व साबुदाण्याच्या उसळीचा हजारो भक्तांनी लाभ घेतला. मालेगाव शहरासह तालुयातील श्रीक्षेत्र डव्हा, शिरपूर, मुंगळा, डोंगरकिन्ही, सुकांडा, चांडस, अमानीसह ठिकठिकाणच्या श्री विठ्ठल-रुख्माई मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली. नागरतास येथील श्री जगदंबा माता मंदिर परिसरातील श्री विठल रुख्मिणी मंदिर आकर्षक फुलांची आरास करून सजविले होते. येथील मंदिरात भाविकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला. मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.