चॅटजीपीटी ठप्प! जगभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांना मोठा धक्का

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
chatgpt down शनिवारी दुपारी ओपनएआयच्या लोकप्रिय चॅटजीपीटी सेवेत अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने भारतासह जगभरातील वापरकर्त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. चॅटजीपीटी वापरताना समस्या येत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्यानंतर कंपनीनेही या समस्येची अधिकृतपणे दखल घेतली आहे. जगभरातील संकेतस्थळे आणि ऑनलाइन सेवांमधील व्यत्ययांचा मागोवा घेणाऱ्या डाउनडिटेक्टरनेही चॅटजीपीटीच्या सेवेत बिघाड झाल्याचे नोंदवले. भारतासह अमेरिका, युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक देशांतील वापरकर्त्यांनी चॅटजीपीटी वापरताना अडचणी येत असल्याचे सांगितले.
 
chatgpt down
 
वापरकर्त्यांना चॅटजीपीटीचे ॲप तसेच संकेतस्थळावरील सेवा वापरताना समस्या जाणवत होत्या. काही वापरकर्त्यांना सेवा उपलब्ध होत नव्हती, तर काहींना प्रश्न विचारल्यानंतर अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. भारतातील अनेक वापरकर्त्यांनी डाउनडिटेक्टरवर यासंदर्भात तक्रारी नोंदवल्या. चॅटजीपीटी सेवा विस्कळीत होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या तांत्रिक समस्येचा तपास सुरू असल्याचे ओपनएआयकडून सांगण्यात आले आहे.
 
चॅटजीपीटी ही ओपनएआयने विकसित केलेली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित संवाद प्रणाली आहे. वापरकर्त्यांच्या सूचनांनुसार ती विविध प्रकारची कामे करू शकते. पत्रलेखन, भाषांतर, कथा लेखन, प्रतिमा निर्मिती आणि इतर मजकूर तयार करण्यासाठी जगभरात मोठ्या प्रमाणावर चॅटजीपीटीचा वापर केला जातो. ईमेल, सोशल मीडिया पोस्ट आणि विविध प्रकारचे मजकूर तयार करण्यासाठीही अनेकजण या सेवेवर अवलंबून आहेत. त्यामुळे अचानक सेवा ठप्प झाल्याने जगभरातील वापरकर्त्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली.