सॅन फ्रान्सिस्को,
chatgpts new health feature अमेरिकेतील १८ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या वापरकर्त्यांसाठी ओपनएआयने चॅटजीपीटीमध्ये ‘हेल्थ’ नावाचे नवे वैशिष्ट्य सादर केले आहे. या सुविधेमुळे वापरकर्त्यांना त्यांचे वैद्यकीय अहवाल, रुग्णालयातील नोंदी आणि ॲपल हेल्थमधील माहिती थेट चॅटजीपीटीशी जोडता येणार आहे. त्यानंतर या माहितीच्या आधारे आरोग्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळवणे आणि वैद्यकीय माहिती सोप्या भाषेत समजून घेणे शक्य होणार आहे.
हे फीचर सध्या अमेरिका येथे वेब आणि आयफोनवर उपलब्ध करण्यात आले आहे. ओपनएआयच्या माहितीनुसार, फ्री, गो, प्लस आणि प्रो प्लॅन वापरणाऱ्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यापूर्वी वैद्यकीय अहवाल समजून घेण्यासाठी वापरकर्त्यांना प्रत्येक वेळी पीडीएफ किंवा छायाचित्र चॅटजीपीटीवर अपलोड करावे लागत होते. मात्र, आता वैद्यकीय नोंदी ‘हेल्थ’ फीचरमध्ये जोडता येणार असल्याने त्याच माहितीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे मिळवता येतील.
नवीन रक्त तपासणी अहवालाची मागील अहवालाशी तुलना करून त्यात झालेले बदल समजून घेण्यास चॅटजीपीटी मदत करू शकते. डॉक्टरांनी लिहिलेली वैद्यकीय नोंद सोप्या भाषेत समजावून सांगण्याबरोबरच डॉक्टरांच्या भेटीपूर्वी कोणते प्रश्न विचारावेत, याची तयारी करण्यासाठीही हे फीचर उपयुक्त ठरू शकते. ॲपल वॉच किंवा आयफोनच्या माध्यमातून ॲपल हेल्थचा वापर करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या झोपेची माहिती, हालचाल, व्यायाम आणि इतर आरोग्यविषयक डेटा चॅटजीपीटीशी जोडता येणार आहे. ॲपल हेल्थसोबत माहिती शेअर करणाऱ्या फिटनेस किंवा पोषणविषयक ॲप्समधील डेटाचाही या सुविधेत वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या आरोग्याशी संबंधित विविध माहिती एकाच ठिकाणी समजून घेणे शक्य होणार आहे.
मात्र, हे फीचर डॉक्टरांचा पर्याय नसल्याचे ओपनएआयने स्पष्ट केले आहे. आरोग्याशी संबंधित उपचार किंवा आजाराविषयीचे महत्त्वाचे निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत, असे कंपनीने म्हटले आहे. आरोग्यविषयक माहितीच्या गोपनीयतेबाबतही ओपनएआयने स्पष्टीकरण दिले आहे. वैद्यकीय नोंदी आणि ॲपल हेल्थमधील डेटा स्वतंत्रपणे आणि सुरक्षितपणे साठवला जाईल, असा कंपनीचा दावा आहे. या माहितीचा वापर चॅटजीपीटीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला प्रशिक्षित करण्यासाठी किंवा जाहिराती दाखवण्यासाठी केला जाणार नसल्याचेही ओपनएआयने म्हटले आहे. चॅटजीपीटीने आपली आरोग्यविषयक माहिती कोणत्या वेळी आणि कोणत्या संभाषणात वापरावी, यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार वापरकर्त्यांकडे असेल.
दरम्यान, या नव्या सुविधेमुळे काही प्रश्नही उपस्थित झाले आहेत. अमेरिकेतील एका व्यक्तीने अलीकडेच चॅटजीपीटीकडून मिळालेल्या वैद्यकीय सल्ल्यावर अवलंबून राहिल्यामुळे त्याला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत, असा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर ओपनएआयने पुन्हा स्पष्ट केले आहे की, चॅटजीपीटी हे केवळ माहिती समजून घेण्यासाठीचे साधन आहे आणि त्याची जागा डॉक्टर घेऊ शकत नाहीत.