पंढरपूर
devendra fadnavis केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार आणि काही नेत्यांना महत्त्वाची खाती मिळणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच राजधानी दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांनाही वेग आला होता. या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते.
या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली होती. “मला महाराष्ट्रातच राहायचं आहे. मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार,” असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनीच दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर भाष्य करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा पार पडली. त्यानंतर टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या पदावर सर्वाधिक काळ राहिले असून, आपणही मुख्यमंत्रीपदावर बराच काळ काम केले आहे, याबाबत विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “निश्चितच पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. पण मी या पदावर सर्वाधिक काळ राहिलेलो नाही. तिसरा माझा क्रमांक आहे. पांडुरंगाची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याला काम करायचं आहे.”पदावर किती काळ राहिलो यापेक्षा त्या काळात किती चांगले काम करता आले, हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. “आपण नेमका त्या काळाचा उपयोग काय केला, हे महत्त्वाचे आहे. मला विश्वास आहे की पांडुरंगाच्या कृपेने अनेक चांगली कामे माझ्या हातून होतील,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.दिल्लीत जाण्याच्या चर्चांबाबत विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त करत स्पष्ट उत्तर दिले. “जे दिलं आहे ते उत्तम आहे. चित्त नेहमी समाधानी असू द्यावं, असं आपण म्हणतो ना. ‘तुका म्हणे उगे रहावे, जे जे होईल ते पहावे, चित्त असू द्यावे समाधानी,’ तसा समाधानी आहे मी,” असे ते म्हणाले.पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला आणि भविष्यात दिल्लीत काम करण्याची किंवा देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर काय, या प्रश्नावरही त्यांनी आपल्या भूमिकेत समाधान आणि संयम असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिल्लीवारीच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे.