मुंबई
devendra fadnavis शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या घडामोडीनंतर देशाच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहेत. फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतर मंतरवर गेल्या एक महिन्यापासून आंदोलन सुरू होते. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी 20 जुलै रोजी संसद भवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चादरम्यान विद्यार्थी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, तसेच लाठीचार्जही करण्यात आला. या कारवाईनंतर देशभरात या प्रकरणावरून वातावरण तापले होते.कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेल्या या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. विविध राज्यांमधून विद्यार्थी जंतर मंतरवर दाखल झाले आणि आंदोलनाने व्यापक स्वरूप धारण केले. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचूक यांनीही उपोषण सुरू केले होते. त्यांनी तब्बल 25 दिवस उपोषण केले. त्यानंतर 26 व्या दिवशी त्यांनी उपोषण सोडले.मात्र, सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेतले असले तरी धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले होते.
शिक्षण मंत्री होणार का?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहेत. या घडामोडींवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.संजय राऊत यांनी दावा केला आहे की, "धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी देशाचे नवे शिक्षणमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते. फडणवीस हे उच्चशिक्षित आणि वकील आहेत, तसेच ते विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत असतात. त्यांना केंद्रामध्ये नेण्याबाबत सातत्याने चर्चा सुरू असते. त्यामुळे योगायोगाने किंवा त्यांच्या दुर्दैवाने, आता त्यांना केंद्रात ही मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही."
विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे नरेंद्र मोदी यांना स्वतःला राजीनामा द्यावा लागेल अशी भीती होती, त्यामुळे त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला, असा दावा संजय राऊतांनी केला.
यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा कॉकरोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ आणि सरकार यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीतही शिष्टमंडळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहिले. सरकारकडून त्यांना शनिवारी दुपारपर्यंत वेळ मागण्यात आला होता. मात्र, त्यापूर्वीच धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे मोठे यश मानले जात आहे. दरम्यान, या राजीनाम्यानंतर केंद्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. ते अमित शाह यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.