दिल्ली
dharmendra pradhan नीट-यूजी परीक्षेतील कथित गैरव्यवहारावरून देशभरात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवला असून, जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राजीनाम्याची माहिती दिली असून, पद सोडण्यामागील कारणही स्पष्ट केले आहे. आपल्या पत्रात त्यांनी नमूद केले की, गेल्या चार दशकांहून अधिक काळ ते विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी समर्पित राहिले आहेत. मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्था ही कोणत्याही राष्ट्राच्या विकासाची पायाभूत गरज असल्याचा त्यांचा कायम विश्वास राहिला आहे.
नीट-यूजी परीक्षेतील अनियमिततेबाबत प्रतिक्रिया देताना धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, ३ मे २०२६ रोजी झालेल्या परीक्षेत गैरव्यवहाराच्या तक्रारी समोर येताच सरकारने तातडीने कारवाई केली. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आला. तसेच परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पुढील वर्षापासून नीट-यूजी परीक्षा पूर्णपणे संगणक आधारित (सीबीटी) पद्धतीने घेण्याची घोषणा करण्यात आली.
आपल्या पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे की, २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा निष्पक्ष आणि सुरळीत पार पाडणे ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता होती. यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन, विद्यार्थी आणि पालक यांच्या सहकार्याने २१ जून २०२६ रोजी पुनर्परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली.
१६ जुलै रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये गरीब आणि वंचित कुटुंबांतील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना यश मिळाले. मात्र, काही जबाबदार पदांवर असलेल्या व्यक्तींनी विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, यामुळे आपल्याला मोठा धक्का बसल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रात म्हटले आहे.
राजीनाम्याबाबत त्यांनी सांगितले की, गेल्या दहा दिवसांतील घटनांनी त्यांना अत्यंत व्यथित केले आहे. हा निर्णय त्यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नसून देशातील तरुणांच्या भवितव्याशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे भविष्य कायदेशीर वाद आणि राजकीय संघर्षांमध्ये अडकू नये तसेच त्यांचे लक्ष शिक्षणापासून विचलित होऊ नये, या भावनेतून आपण पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी नमूद केले आहे.