नाशिक
earthquake नाशिक आणि पालघर जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात आज सकाळी एकापाठोपाठ चार भूकंपाचे धक्के जाणवले, तर पालघर जिल्ह्यातही भूकंपाचे सत्र कायम असल्याचे पाहायला मिळाले. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झालेली नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बोरगाव आणि आसपासच्या परिसरात आज सकाळी 9 वाजून 55 मिनिटांपासून भूकंपाचे चार सौम्य धक्के जाणवले. या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी नोंदवण्यात आली आहे. सलग चार वेळा जमिनीला हादरे बसल्याने बोरगाव परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आणि अनेक नागरिक खबरदारी म्हणून घराबाहेर पडले.
नुकसान नाही
प्रशासनाच्या माहितीनुसार, या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा आणि धुंदलवाडी परिसरातही आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. सकाळी 10 वाजून 57 मिनिटांच्या सुमारास आलेल्या या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.1 इतकी नोंदवण्यात आली. या हादऱ्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालघर जिल्ह्यात 2018 पासून भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र सुरू आहे. आतापर्यंत या भागात कमी-अधिक तीव्रतेचे अडीच हजारांहून अधिक भूकंपाचे हादरे बसले आहेत. या धक्क्यांमुळे अद्याप मोठी जीवितहानी झालेली नसली तरी ग्रामीण भागातील अनेक घरांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
डहाणू आणि तलासरी परिसरातील आदिवासी गावपाड्यांमध्ये कच्च्या बांधकामांच्या घरांच्या भिंतींना वारंवार होणाऱ्या हादऱ्यांमुळे तडे गेले आहेत. सततच्या भूकंपामुळे हजारो घरे धोकादायक स्थितीत पोहोचली आहेत. तीन वर्षांपूर्वी या भागात देण्यात येणारी घरकुले भूकंपरोधक पद्धतीने बांधण्यात येतील, असे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याने वारंवार जाणवणाऱ्या धक्क्यांमुळे नागरिक पुन्हा एकदा चिंतेत आहेत.
दरम्यान, नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गोदावरी नदीला पूर आला आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून 71 हजार क्युसेक, दारणा धरणातून 19 हजार 312 क्युसेक आणि गंगापूर धरणातून 12 हजार 680 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.चांदोरी, सायखेडा, कोठुरे, करंजगाव आणि चापडगाव यांसह अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. यामुळे ऊस, सोयाबीन आणि मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पूरग्रस्त नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने नाशिक शहरातील गोदावरी नदीची पाणीपातळी काही प्रमाणात घटली असून गोदाघाट परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.