कोलकाता,
ed raids उत्पादन शुल्क भ्रष्टाचाराच्या कथित प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी सकाळी अनेक ठिकाणी छापे टाकले़ एजन्सीची ही कारवाई कोलकाता येथील एका दारू कंपनीच्या कार्यालयासह पुरुलिया आणि इतर राज्यांमध्ये सुरू आहे. पुरुलिया जिल्ह्यातील नितुडिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत परबेलिया बाजारजवळ एका हॉटेल मालकाच्या घराची ईडी अधिकाऱ्यांनी झडती घेतली. सूरज विश्वकर्मा यांच्या घरीही शोध घेण्यात आला.

त्यांच्या मालकीच्या एका रेस्टॉरंटचीही सकाळपासून झडती घेतली जात होती. सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणांच्या बाहेर केंद्रीय दले तैनात करण्यात आली आहेत. ईडीच्या सूत्रांनुसार, संबंधित दारू कंपनीवर उत्पादन शुल्क चुकवल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणेने ज्या रेस्टॉरंटमध्ये कंपनीची दारू विकली जात होती, तिथेही छापेमारी केली आहे. राज्य पोलिसांनी २०१५-१६ मध्ये एफआयआर नोंदवून उत्पादन शुल्क वसुलीतील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सुरू केली होती. चौकशीदरम्यान आर्थिक अनियमिततेचे आरोप समोर आल्यानंतर ईडीने २०२१ मध्ये ईसीआयआर नोंदवून तपास आपल्या ताब्यात घेतला. शुक्रवारी सुरू करण्यात आलेली कारवाई ही याच प्रकरणाच्या तपासाचा एक भाग असल्याचे म्हटले जात आहे.