झंडू कुमारने जिंकले भारताचे पहिले पदक

ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
ग्लासगो,
glasgow commonwealth games भारताच्या झंडू कुमारने शुक्रवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंग प्रकारात कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच पदक ठरले.पोलिओ, गरिबी आणि उदरनिर्वाहासाठी केलेली अनेक छोटी-मोठी कामे अशा आव्हानात्मक बालपणावर मात करीत २८ वर्षीय कुमारने १८१ किलो आणि १९० किलो वजन यशस्वीपणे उचलत एकूण १३०.९ गुण मिळविले व पदक विजेत्यांच्या यादीत स्थान मिळविले. मात्र, १९६ किलो वजन उचलण्याचा त्याचा अंतिम प्रयत्न अयशस्वी ठरला. या स्पर्धेत सहभागी असलेला दुसरा भारतीय खेळाडू सुधीर (११४.१ गुण) सहाव्या स्थानावर राहिला. नायजेरियाच्या इद्रिस रिलुवानने १३२.८ गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर मॅथ्यू हार्डिंगने (१३१ गुण) रौप्यपदक पटकावले.
 
 
glasgow commonwealth games
 
कुमारचा हा विजय बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील हरनौत गावापासून सुरू झालेल्या त्याच्या उल्लेखनीय प्रवासाचा कळस ठरला. वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओची लागण झाल्यानंतर, कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी तो आपल्या पालकांना भाजीपाला विकण्याच्या कामात मदत करत असे.
 
आर्थिक पाठबळ कमी असतानाही, कुमारने सुरुवातीला २०१० ते २०१२ या काळात केवळ शारीरिक ताकद वाढवण्यासाठी वजन उचलण्याचा सराव सुरू केले होता त्यानंतर त्याने गोळाफेक व भालाफेक या खेळांमध्येही प्रयत्न केले. अखेरीस, पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये त्याला आपली खरी आवड सापडली. मात्र, उच्च-स्तरीय स्पर्धेसाठी आवश्यक असलेला सकस आहार परवडत नसल्यामुळे, कुमारने भाजीपाल्याचा छोटा व्यवसाय केला. व्हीलचेअर नसतानाही तो स्थानिक बाजारपेठांपर्यंत सुमारे २० किलोमीटरचा प्रवास करत असे.
 
नंतर उदरनिर्वाहासाठी ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी त्याने मित्रांकडून पैसे उसने घेतले, परंतु कोरोनामुळे त्याच्या या योजनांमध्ये व्यत्यय आला. अखेरीस त्याच्या जिद्दीचे फळ मिळाले आणि तो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला. माझा आनंद शब्दांत मांडता येणार नाही. सर्वात आधी मी घरी माझ्या पालकांना फोन करेन, असे कुमार पदक जिंकल्यानंतर म्हणाला.