सांभाळून रहा रे... अतिमुसळधार पावसाचा इशारा

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
मुंबई
heavy rainfall राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून, भारतीय हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.
 

heavy rainfall  
गुना, सिधी आणि ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत मॉन्सून सक्रिय झाला असून, गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
 
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आधीपासूनच पावसाने जोर धरला असून, अनेक भागांत सतत पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आजही राज्यासाठी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्यात पावसाचा प्रचंड जोर वाढण्याची शक्यता असून, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, महाराष्ट्रासह देशातील 23 राज्यांसाठी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश आणि गुजरात यांसह विविध राज्यांमध्ये पावसाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. या काळात ताशी 75 किलोमीटर वेगापर्यंत वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मुंबईत सकाळपासूनचheavy rainfall  पावसाने हजेरी लावली. मुंबईसह ठाणे, पालघर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, बीड, नांदेड, हिंगोली आणि जालना या जिल्ह्यांसाठी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली होती. जून महिन्यात राज्यात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहिले होते. मात्र जूनच्या अखेरीस पावसाने जोरदार पुनरागमन केले. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, पुढील काही दिवस राज्यात पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.