आयसीसी मध्ये खळबळ मुख्य अभियोजक करीम खान यांची पदावरून हकालपट्टी

लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांनंतर कारवाई

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
न्यूयॉर्क
karim khan आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या (ICC) सदस्य देशांनी गुप्त मतदानाच्या माध्यमातून न्यायालयाचे मुख्य अभियोजक (चीफ प्रॉसिक्यूटर) करीम खान यांना त्यांच्या पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. एका माजी महिला सहकाऱ्याने केलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांनंतर तसेच गंभीर गैरवर्तन आणि कर्तव्यच्युतीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
 

karim khan 
न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात बंद दरवाजाआड झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हे मतदान पार पडले. ICC च्या एकूण 125 सदस्य देशांपैकी 82 देशांनी करीम खान यांना पदावरून हटवण्याच्या बाजूने मतदान केले. 13 देशांनी खान यांच्या समर्थनार्थ मतदान केले, तर 15 देशांनी मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. उर्वरित सदस्य देशांनी या मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही.
 
 
करीम खान यांच्यावर गंभीर गैरवर्तन आणि त्यांच्या कर्तव्यांचे गंभीर उल्लंघन केल्याचा आरोप सिद्ध झाल्याचे मानून सदस्य देशांनी ही कारवाई केली.या प्रकरणाची सुरुवात मे 2025 मध्ये झाली, जेव्हा करीम खान यांच्या एका माजी सहकाऱ्याने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले. सुरक्षा कारणास्तव मलेशियन वंशाच्या या वकिलाचे नाव ‘सारा’ असे ठेवण्यात आले आहे. तक्रारदार महिलेने आरोप केला होता की, खान यांचे वर्तन कालांतराने अधिक गंभीर होत गेले आणि अखेरीस ते शारीरिक हल्ल्यापर्यंत पोहोचले.
 
 
“जेव्हा सत्ता आणि पदामध्ये karim khan इतका मोठा फरक असतो, तेव्हा संमतीसारखे काही उरत नाही. ते केवळ माझे बॉस नव्हते, तर संपूर्ण संस्थेतील सर्वात मोठे अधिकारी होते,” असे पीडित महिलेने म्हटले आहे.या आरोपांची चौकशी सुरू झाल्यानंतर मागील महिन्यात करीम खान यांना त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर ICC सदस्य देशांनी केलेल्या मतदानातून अखेर त्यांना पदच्युत करण्याचा निर्णय घेण्यात आला.दरम्यान, 56 वर्षीय करीम खान यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत. त्यांच्या वकिलांनी या निर्णयाच्या निष्पक्षतेवर आणि वैधतेवर प्रश्न उपस्थित करत, तो आव्हान देण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व कायदेशीर मार्गांचा वापर केला जाईल, असे सांगितले आहे.