अमरावती
incomplete-highway-flyover शहरातील अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील रहाटगावनजीक नव्याने उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा एक अत्यंत बेजबाबदार आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या उड्डाणपुलाचे काम अद्याप अपूर्ण असताना आणि कोणतेही अधिकृत उद्घाटन झाले नसतानाच पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या गंभीर निष्काळजीपणावर शिवसेनेचे युवा पदाधिकारी संकेत डालके यांनी तीव्र संताप व्यक्त करीत महामार्ग प्राधिकरणाला थेट जाब विचारला आहे.

incomplete-highway-flyover महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणाऱ्या रहाटगाव चौकातील उड्डाणपुलाचे काम काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र, पुलावर अनेक ठिकाणी अद्यापही कामे बाकी आहेत. असे असतानाही कोणत्या आधारावर आणि कोणाच्या परवानगीने हा अपूर्ण पूल वाहतुकीसाठी उघडा करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकाराने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. निष्काळजीपणाच्या या प्रकारावर शिवसेनेचे युवा पदाधिकारी संकेत डालके यांनी अत्यंत कडक शब्दांत प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नसताना आणि अधिकृत उद्घाटन झाले नसताना घाईघाईत वाहतूक सुरू करणे म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. या अपूर्ण पुलावरून वाहतूक सुरू असताना एखादा गंभीर अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महामार्ग प्राधिकरण घेणार का, असा परखड सवाल डालके यांनी केला आहे.
incomplete-highway-flyover रहाटगाव चौक हा नेहमीच मोठ्या वाहतुकीचा आणि वर्दळीचा भाग राहिला आहे. अपूर्ण उड्डाणपुलामुळे वाहनधारकांचा गोंधळ उडत असून अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने त्वरित या प्रकाराची दखल घेऊन सुरक्षेच्या सर्व उपाययोजना पूर्ण कराव्यात आणि अधिकृत कामाच्या पूर्ततेनंतरच पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.