राज्यस्तरीय स्पर्धेत काैंडण्यपूरची दिंडी प्रथम

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
तिवसा
vitthal-nirmal-dindi-award वारकरी संप्रदायाच्या शतकानुशतकांच्या पवित्र परंपरेला स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि समाजप्रबोधनाची जोड देणाऱ्या दिंड्यांचा गौरव करणाऱ्या राज्य शासनाच्या प्रतिष्ठेच्या ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार-२०२६' मध्ये श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत मानाचा तुरा शिरपेचात खोवला आहे. देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा बहुमान प्रदान करण्यात आला.
 
amrawati cm
 
vitthal-nirmal-dindi-award यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात राज्यभरातील उत्कृष्ट दिंड्यांचा गौरव करण्यात आला. त्यात कौंडण्यपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानाला १ लाखाचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे सचिव तथा पालखी सोहळा प्रमुख सदानंद साधू व पालखी दिंडी चालक पंकज महाराज महल्ले उपस्थित होते. पुरस्कार जाहीर होताच वारकरी, भाविक आणि कौंडण्यपूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
vitthal-nirmal-dindi-award या पुरस्कारासाठी दिंडीमधील स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, प्लॅस्टिकमुक्त वारी, सामाजिक जनजागृती, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि प्रबोधनात्मक उपक्रमांचा विचार करण्यात आला. या सर्व निकषांमध्ये कौंडण्यपूरच्या दिंडीने उत्कृष्ट कामगिरी करीत प्रथम क्रमांक पटकावला.
 
vitthal-nirmal-dindi-award स्पर्धेत वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान, जालना यांनी द्वितीय क्रमांक मिळवत ७५ हजारांचा धनादेश व सन्मानचिन्ह, तर श्री गोऱ्हेकर संस्था, आळंदी यांनी तृतीय क्रमांक मिळवत ५० हजारांचा धनादेश व सन्मानचिन्ह प्राप्त केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारकरी संप्रदायाच्या अखंड परंपरेचे आणि समाजप्रबोधनातील दिंड्यांच्या मोलाच्या योगदानाचे विशेष कौतुक केले. स्वच्छ, निर्मल आणि पर्यावरणपूरक वारी ही काळाची गरज असून, अशा आदर्श उपक्रमांना राज्य शासनाकडून भविष्यातही सर्वतोपरी प्रोत्साहन दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यस्तरीय या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे श्री क्षेत्र कौंडण्यपूर आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान यांच्या कार्याचा राज्यभर गौरव झाला असून, वारकरी परंपरेला नवी प्रेरणा मिळाल्याची भावना भाविक आणि वारकरी बांधवांनी व्यक्त केली आहे.