‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही

विरोधकांच्या टीकेला अदिती तटकरे यांचे प्रत्युत्तर

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
मुंबई
ladki bahin yojana महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. कधी या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या मुद्यावरून, तर कधी समोर आलेल्या गैरप्रकारांमुळे आणि आता ई-केवायसीच्या प्रक्रियेवरून या योजनेबाबत चर्चा सुरू आहे. योजनेतील काही लाभार्थ्यांकडून झालेल्या गैरप्रकारांचे प्रकार उघडकीस आल्यानंतर सरकारने त्याला आळा घालण्यासाठी लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया राबवली. या पडताळणीत अनेक अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली असून, त्यामुळे काही महिलांना दर महिन्याला मिळणारा योजनेचा हप्ता बंद झाल्याचे समोर आले.
 

ladki bahin yojana will continue says aditi tatkare amid opposition criticism in maharashtra 
लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. ‘लाडक्या बहिणींची गरज आता संपली असून ही योजना बंद होऊ शकते,’ असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. मात्र राज्य सरकारने या योजनेबाबत स्पष्टीकरण देत ती सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पुन्हा एकदा सांगितले की, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना कायम सुरू राहणार आहे. तसेच या योजनेवरून टीका करणाऱ्यांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले.
 
 
 
लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून होणारी टीका आपण गांभीर्याने घेत नसल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले. योजना सुरू करताना काही विरोधकांनी ‘ही योजना आणू नका, त्यामुळे शासनाचे नुकसान होईल,’ असा विरोध केला होता. काही मंडळी या मुद्यावरून उच्च न्यायालयातदेखील गेली होती. त्यामुळे ज्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली, त्यांना आता लाडक्या बहिणींचा पुळका येऊ शकत नाही, असा टोला तटकरे यांनी लगावला.सरकारकडून चांगले काम केले जात असताना टीका होणे स्वाभाविक असल्याचेही त्यांनी नमूद केले. विरोधकांची भूमिका ही टीका करण्याचीच असते, असेही त्या म्हणाल्या. सरकारी योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच महायुती सरकारचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.यंदाच्या अधिवेशनात महिला शेतकऱ्यांसाठी सरकारने धोरण आणले असून, ते महिलांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. ‘लखपती दीदी’ योजनेसह इतर विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता चुकलेला नसल्याचा दावा अदिती तटकरे यांनी केला. एखाद्या महिन्याचा हप्ता काही कारणाने थांबला असेल, तर पुढील महिन्यात दोन महिन्यांची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.