मुंबई
maharashtra dam water storage राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होत आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पात्रातील प्रसिद्ध दुतोंड्या मारुतीची मूर्ती पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, या पावसामुळे राज्यातील जलाशयांसाठी दिलासादायक चित्र समोर आले आहे. विविध भागांतील धरणांमध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे.
राज्यातील एकूण 3029 धरणांमध्ये सध्या एकूण साठवण क्षमतेच्या 53.38 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी याच तारखेपर्यंत राज्यातील सर्व जलाशयांमध्ये एकूण साठवण क्षमतेच्या 63.42 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत पाणीसाठ्यात 10.04 टक्क्यांची तफावत आहे.
राज्यातील विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार केला असता, कोकण विभागातील जलाशयांमध्ये सर्वाधिक पाणीसाठा जमा झाला आहे. कोकणातील धरणांमध्ये आतापर्यंत 76.54 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. त्यानंतर पुणे विभागातील जलाशयांमध्ये 65.27 टक्के, नाशिक विभागात 55.11 टक्के, नागपूरमध्ये 46.71 टक्के आणि अमरावती विभागात 42.91 टक्के इतका पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे.
मात्र, मराठवाड्यातील परिस्थिती तुलनेने चिंताजनक आहे. यंदा छत्रपती संभाजीनगर विभागात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने तेथील जलाशयांमध्ये केवळ 25.44 टक्के इतकाच पाणीसाठा जमा झाला आहे. काही दिवसांपासून पाऊस सुरू असूनही मराठवाड्यातील धरणांमध्ये समाधानकारक वाढ झालेली नाही.
धरणांच्या श्रेणीनुसार पाहिल्यास कोकण विभागातील मोठ्या धरणांमध्ये 77.19 टक्के तर पुणे विभागातील मोठ्या धरणांमध्ये 70.15 टक्के पाणीसाठा झाला आहे. कोकणातील मध्यम श्रेणीच्या धरणांमध्ये 77.06 टक्के आणि छोट्या धरणांमध्ये 73.06 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे.
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर विभागातील जलाशयांमध्ये 32.70 टक्के पाणीसाठा असून, छोट्या धरणांमध्ये केवळ 13.86 टक्के पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत मुसळधार पावसामुळे दिलासा मिळत असला तरी मराठवाड्यातील जलसाठ्याची स्थिती अद्याप चिंतेचा विषय ठरत आहे.