पंढरपूर,
cm fadnavis आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूर नगरी विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. यावेळी मानाचे वारकरी माने दांपत्य यांनाही महापूजेत सहभागी करून घेण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी माने दांपत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची शोडशोपचार पद्धतीने विधिवत पूजा केली. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला यावेळी विशेष पोशाख अर्पण करण्यात आला. महाराष्ट्रातील शेतकरी, वारकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी तसेच राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली.
महाराष्ट्राच्या अन्नदात्या बळीराजावर कोणतेही संकट येऊ नये, त्याला सुख-समृद्धी लाभावी आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाचे जीवन आनंदी व सुरक्षित राहावे, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये भक्तीचा आणि श्रद्धेचा अनोखा संगम पाहायला मिळत असून, विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पादुका मंदिराच्या नव्या भक्त निवासाचे भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.
आळंदी देवस्थानच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या या भक्त निवासामुळे पंढरपूरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत.cm fadnavis संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका मंदिरासोबत उभारण्यात येणारे हे भक्त निवास भविष्यात वारकरी आणि भाविकांसाठी महत्त्वाचे सुविधा केंद्र ठरणार आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अविस्मरणीय सोहळा अनुभवायला मिळत आहे.