पंढरपूर
pandharpur wari आषाढी एकादशीनिमित्त पंढरीत लाखो भाविक दाखल झाले असून वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासनाने आरोग्य आणि इतर आवश्यक सुविधांची व्यापक व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेची प्रचिती एका प्रसंगातून आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडसावंगी येथील वारकरी बाळू आसाराम पडूळ यांना चालत असतानाच अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मात्र, प्रशासनाची तत्परता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या निर्देशांमुळे त्यांचा जीव वाचला.
`
बाळू आसाराम पडूळ हे वारीत सहभागी झाले होते. चालत असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि काही क्षणांतच ते खाली कोसळले. ही घटना लक्षात येताच उपस्थित वारकरी आणि आरोग्य पथकाने तातडीने धाव घेत त्यांना मदत केली.
या घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी प्रशासनाला त्वरित वैद्यकीय मदतीचे निर्देश दिले. प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी तातडीने हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली. आरोग्य विभाग आणि प्रशासनाच्या समन्वयातून बाळू पडूळ यांना त्वरित सोलापूर येथे हलवण्यात आले.वेळेत उपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पंढरपूर वारीदरम्यान प्रशासनाने उभारलेल्या आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणेची तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.दरम्यान, बाळू पडूळ यांनी सांगितले की, गुरुवारी ते पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. शुक्रवारी सकाळी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तातडीने त्यांना सोलापूरला हलवण्यात आले. “मुख्यमंत्र्यांमुळे मी मृत्यूच्या दाढेतून वाचलो असून, आता माझी प्रकृती ठीक आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.