पुणे
malaria cases मुसळधार पावसानंतर पुणे शहरात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे. शहरात डेंग्यू आणि हिवताप (मलेरिया) रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर सुरू केल्या आहेत.
यंदाच्या दमदार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढली असून, त्यातून डेंग्यू आणि हिवतापासारख्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. २१ जुलै २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, पुणे शहरात डेंग्यूचे तब्बल ३ हजार ७६२ रुग्णांची नोंद झाली आहे. तर हिवतापाच्या रुग्णांची संख्या २ हजार ३६ इतकी झाली आहे.वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली असून, संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये घरोघरी जाऊन ताप सर्वेक्षण मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. संशयित रुग्णांचे रक्तनमुने गोळा करून त्यांची तातडीने तपासणी केली जात आहे.
याशिवाय, दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये तसेच पाणी साचणाऱ्या परिसरात प्रभावी कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध माध्यमांतून व्यापक अभियानही राबविण्यात येत आहे.डेंग्यू आणि हिवतापाचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये, स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि ताप अथवा इतर लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.