नवी दिल्ली,
rahul gandhi नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच या आंदोलनाला राजकीय पाठिंबा मिळाला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि उपोषण करणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांच्या विद्यार्थ्यांसोबत जंतर मंतरवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण प्रकरणाबद्दल देशाची आणि विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी करताना राहुल गांधी यांनी त्यांना दुसरे मंत्रालय देण्याच्या चर्चेलाही विरोध केला. शिक्षणमंत्र्यांचा केवळ विभाग बदलणे हा पर्याय विद्यार्थ्यांना मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या तीन मागण्यांवर कोणतीही तडजोड होणार नसल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले. राहुल गांधी म्हणाले की, त्यांनी उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे. या संपूर्ण आंदोलनाचे मुद्दे कशा पद्धतीने बाजूला सारले जात आहेत, यावरही चर्चा झाली. भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आणि चुकीच्या मानसिकतेसाठी जबाबदार असलेल्या शिक्षणमंत्र्यांना पदावरून हटवले पाहिजे, अशी विद्यार्थ्यांची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
धर्मेंद्र प्रधान यांना दुसरे मंत्रालय देण्याबाबत मोदी मंत्रिमंडळात चर्चा सुरू असल्याचे आपण ऐकले आहे. मात्र, विद्यार्थ्यांना हा पर्याय मान्य होणार नाही, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित हिंसाचाराचा मुद्दाही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. त्यांनी आपल्या शेजारी उभ्या असलेल्या एका जखमी तरुणीकडे लक्ष वेधत विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा उल्लेख केला. यापूर्वी एका तरुणाच्या डोळ्यात पेलेट लागल्याचेही त्यांनी सांगितले होते. हजारो विद्यार्थ्यांचे पाय, डोके आणि हात मोडले असून पेलेट गनमुळे अनेक जण जखमी झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.
या कारवाईचे आदेश देणारे अधिकारी असोत किंवा प्रत्यक्ष कारवाईत सहभागी असलेले पोलीस असोत, विद्यार्थ्यांवरील हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. दरम्यान, संपूर्ण व्यवस्थेचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर विद्यार्थ्यांची आणि देशाची माफी मागावी, असेही राहुल गांधी यांनी म्हटले. विद्यार्थ्यांच्या या तीन मागण्या कोणत्याही वाटाघाटीशिवाय मान्य झाल्या पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
गेल्या शुक्रवारी केंद्र सरकार आणि सीजेपी नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. सीजेपीने मांडलेल्या तीन मागण्यांपैकी दोन मागण्यांबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेत असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवीन कायद्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. मोदी मंत्रिमंडळाने पेपरफुटी रोखण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रस्तावित नवीन कायद्याला मंजुरी दिली आहे. या कायद्यानुसार, पेपरफुटीच्या प्रकरणात दोषी ठरलेल्यांना जलदगती न्यायालयांमार्फत तीन महिन्यांच्या आत शिक्षा सुनावण्याची तरतूद करण्यात येणार आहे. नवीन कायद्यात दोषींना १० वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तसेच १० कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याचे सांगितले जात आहे. पेपरफुटीविरोधात सरकारने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आता, पेपरफुटीशी संबंधित नवीन विधेयक सरकारकडून सोमवारी सादर केले जाण्याची शक्यता आहे.