मुंबई
ramayana trailer यंदाच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘रामायण’च्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार असून, 24 जुलै रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. मात्र, आता निर्मात्यांनी ट्रेलरचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “‘रामायण’साठी आजचा दिवस खूप खास आहे. ‘रामायण’ जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं माझं स्वप्न आता ‘सोनी पिक्चर्स एंटरटेन्मेंट’सोबतच्या भागीदारीमुळे प्रत्यक्षात येत आहे. त्यामुळे आता आम्ही चित्रपटाचा ट्रेलर जागतिक स्तरावर नंतर प्रदर्शित करणार आहोत.”
या निर्णयामागे चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करण्याचा उद्देश असल्याचे निर्मात्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.दरम्यान, ‘सॅन डिएगो कॉमिक-कॉन 2026’ या कार्यक्रमात रणबीर कपूर, यश, निर्माते नमित मल्होत्रा आणि दिग्दर्शक नितीश तिवारी यांनी हजेरी लावली होती. यावेळी रणबीरने प्रभू श्रीरामांची भूमिका साकारण्यापूर्वी मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या.रणबीर कपूरने सांगितले की, या चित्रपटासाठी विचारणा झाल्यानंतर त्याच्या मनात अनेक प्रश्न आणि भीती होती. “मी ही भूमिका निभावू शकेन का? मी त्यासाठी पुरेसा सक्षम आहे का?” असे अनेक प्रश्न त्याला पडले होते. मात्र, त्यानंतर त्याच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण झाली. आयुष्यात एकदाच मिळणारी ही सुवर्णसंधी असून त्यासोबत मोठी नैतिक जबाबदारीही असल्याचे त्याने नमूद केले.
प्रभू श्रीरामांच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना रणबीर म्हणाला की, श्रीराम हे आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. धैर्य, करुणा, क्षमाशीलता आणि धर्मनिष्ठा या मूल्यांचे ते प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका साकारण्याची संधी जितकी मोठी आहे, तितकीच ती जबाबदारीही मोठी असून काही प्रमाणात दडपण आणणारी आहे.
रणबीरने पुढे सांगितले की, अशा प्रकारची भूमिका साकारण्यासाठी प्रचंड श्रद्धा, ठाम विश्वास, प्रामाणिकपणा आणि उदात्त हेतू असणे आवश्यक आहे. ‘रामायण’ची कथा शक्य तितक्या प्रामाणिकपणे आणि तिच्या मूळ भावनेनुसार प्रेक्षकांसमोर मांडणे हा संपूर्ण कलाकार आणि तांत्रिक टीमचा एकमेव उद्देश असल्याचेही त्याने स्पष्ट केले.या भव्य प्रकल्पाकडे देशासह जगभरातील प्रेक्षकांचे लक्ष लागले असून, ट्रेलरच्या नव्या प्रदर्शन तारखेची आता उत्सुकता आहे.