अविवाहितांची वाढती संख्या; गंभीर सामाजिक समस्या

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
वेध,
विजय कुळकर्णी,
rising-number-of-unmarried-people : तरुण-तरुणी अविवाहित राहण्याचे वाढते प्रमाण ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. जीवनाचा एक टप्पा असा येतो की, तेथे एका जोडीदाराची नितांत गरज भासते. जोडीदार नसेल तर पद, पैसा, प्रतिष्ठा याला काहीच अर्थ उरत नाही. एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला आहे की, आगामी ६ वर्षात जगातील अंदाजे ४० टक्क्यांपेक्षा जास्त महिला अविवाहित राहतील. हा अहवाल एका वृत्तपत्रात मे २०२६ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. मॉर्गन स्टॅनली याच्याअभ्यासाचा आधार घेण्यात आला आहे.
 

JKL 

संग्रहित फोटो
 
आजच्या महिला उच्चशिक्षित, करीअरला प्राधान्य देणाऱ्या आहेत. त्या स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम असून कोणावरही अवलंबून राहू इच्छित नाहीत. त्यांना स्वातंत्र्य आवडते. आपल्या आयुष्याचे निर्णय त्या स्वत: घेऊ इच्छितात. लग्न, मातृत्व, कौटुंबिक जबाबदाऱ्यांना त्या आपल्या प्रगतीच्या मार्गातील अडथळे मानतात. हे असेच सुरू राहिल्यास पारंपरिक कौटुंबिक रचना आणि सामाजिक चौकट विस्कटून जाईल. तसेच, काही महिला त्यांच्या आई-वडिलांना एकुलत्या एक असतात. त्यामुळे आपल्या माता-पित्यांची जबाबदारी कोण सांभाळेल? होणारा नवरा किंवा सासरची मंडळी त्यांना स्वीकारतील का? इत्यादी प्रश्न त्यांच्या समोर असतात. मात्र, त्यांच्या अविवाहित राहण्याच्या निर्णयामुळे लोकसंख्या घटणे, अविवाहित पुरुषांची संख्या वाढणे, वार्धक्याच्यावेळी एकाकीपणाची समस्या बळावते. अनेक आई-वडील त्यांच्या मुलींसाठी स्थळे शोधत आहेत. पण, मुलींना स्वत:लाच लग्न करण्याची इच्छा नाही. आजही समाजातील एक मोठा वर्ग या सामाजिक समस्येपासून अनभिज्ञ आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकारने मुलींचे लग्नाचे वय १८ वर्षे निश्चित केले. तरीही आज मुली किमान पदवीधर होतात. नोकरी करतात. त्यामुळे मुलींच्या लग्नाचे वय २३ ते २६ वर्षादरम्यान योग्य मानले जाते. यासाठी सामूहिक स्तरावर जनजागृती आणि प्रयत्न होणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत १६ संस्कार सांगितले आहेत. लग्न हा त्याच संस्कारांपैकी एक आहे. तसेच, विवाह ही एक संस्था मानली जाते. विवाह संस्था टिकल्यास कुटुंब आणि समाज व्यवस्था कायम राहील. वैयक्तिक जीवनात संतुलन राखणे हीच खरी प्रगती आहे. मुलीचे लग्न २० व्या वर्षी झाल्यास एका शतकात किमान ५ पिढ्या होत होत्या.
 
 
 
२५ व्या वर्षी झाल्यास ४ पिढ्या आणि आता मुली ३० वर्षांच्या होत आहेत. तेव्हा एका शतकात केवळ ३ पिढ्या होत आहेत. त्यामुळे आपला समाज पुढील शतकापर्यंत टिकेल का? लग्न मोडण्याची अनेक कारणे आहेत. मुख्य कारण म्हणजे मुला-मुलींचे वय. वयामुळे अनेक शारीरिक बाधा निर्माण होतात. त्यामुळे संततिप्राप्तीचे योग कमी होतात. परिणामी सहजीवन सुखकर नसल्याने काडीमोड घेतला जातो. परिणामी मोडलेले कुटुंब, दु:खी आणि एकाकी पडलेले आई-वडील, एक पिढी मोठी पोकळी अनुभवत असते. जर ५० जोडप्यांना एकच अपत्य असेल तर पुढच्या पिढीतील मुलांची संख्या नगण्य राहते. हे असेच सुरू राहिल्यास तिसरी पिढी जवळपास नाहीशीच होईल. शहरात मोठमोठ्या इमारती आहेत. पण, त्यातील संयुक्त कुटुंब व्यवस्था नाहीशी झाली आहे. मुलांना वेळेवर ना नोकऱ्या मिळत आहेत, ना वेळेवर लग्न होत आहे. परिणामी मुले समाजासोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे पसंत करतात. विभक्त कुटुंब पद्धतीत वाढ झाली आहे. वाढत्या वयामुळे अनेक जण अविवाहित आहेत. लग्न, कुटुंब, अपत्य हे या तरुण-तरुणींना नकोसे वाटत आहे. पण, लग्न हे केवळ संसारिक बंधन नसून ते घर, कुटुंब आणि समाजाचा मुख्य आधार आहे. लग्नाला आपल्याकडे संस्था म्हणून मान्यता आहे. तो वंश, सभ्यता आणि संस्कृती पुढे नेण्याचा मार्ग आहे. मजबूत कौटुंबिक रचनेच्या अभावामुळे आज जगातील बहुतांश देश आणि भारतातही कौटुंबिक परंपरा ऱ्हास पावत आहे. रक्ताची नाती नष्ट होत आहेत. याचा विचार करता या गंभीर समस्येतून मार्ग काढण्यासाठी कौटुंबिक प्रबोधन आजच्या काळाची नितांत गरज आहे. n
८८०६००६१४९