तभा वृत्तसेवा
पुसद,
rss राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पुसद नगर व पुसद खंडाच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांच्या मालिकेतील युवा संमेलन अग्रवाल मंगल कार्यालय, पुसद येथे उत्साहपूर्ण पार पडले.
या संमेलनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत व्यवस्था प्रमुख मोहन अग्निहोत्री हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते, तर बा. ना. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश वानखेडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा संघचालक डॉ. पंकज जैस्वाल उपस्थित होते.
मोहन अग्निहोत्री यांनी मार्गदर्शन करताना सध्याच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत युवकांनी जागरूक राहून देश, धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी त्याग, सेवा व समर्पणाची भावना जोपासावी, असे आवाहन केले. स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणत संघाच्या राष्ट्रकार्याशी जोडले जाण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. चारित्र्यसंपन्न युवकांमध्येच देशाची दशा व दिशा बदलण्याचे सामर्थ्य असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. अविनाश वानखेडे यांनी आजच्या तरुण पिढीने विचारपूर्वक व स्वयंशिस्तीने वागण्याची गरज व्यक्त केली. समाजात शिस्तप्रिय व शिस्तहीन असे दोन प्रकारचे युवक आढळतात. राष्ट्रनिर्मितीसाठी प्रत्येक तरुण स्वयंशिस्तीचा, अभ्यासू व कर्तव्यनिष्ठ असावा, असे मत त्यांनी मांडले.
खंड सहकार्यवाह रवी घड्याळे यांनी प्रास्ताविक केले. सुमारे पाच तास चाललेल्या या संमेलनात शाखा प्रात्यक्षिके, संवाद सत्र, चर्चासत्र, देशभक्तीपर गीत तसेच विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. युवकांनी सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
संमेलनासाठी नगर, तालुका, जिल्हा तसेच विविध व्यवस्थांतील स्वयंसेवकांनी विविध जबाबदाèया पार पाडल्या. प्रथमच सहभागी झालेल्या 145 युवकांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यात संघाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली.