नागपूर,
special grants for gram- panchayats ग्रामीण भागाचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी राज्य शासनाने ग्रामपंचायतींना मोठी भेट दिली आहे. ग्रामविकास विभागाने २० जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, ‘ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान’ या जिल्हा वार्षिक योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता गावांमध्ये फक्त रस्ते-नालेच नाहीत, तर दिवाबत्ती, सोलर, वाचनालय, क्रीडांगण आणि सौंदर्यीकरण यांसारखी पायाभूत कामेही होऊ शकणार आहेत. कोणती ५ नवीन कामे समाविष्ट? शासनाने या योजनेत ५ नवीन प्रकारची कामे समाविष्ट केली आहेत. प्रत्येक कामासाठी कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
कामाचा प्रकार कमाल अनुदान मर्यादा
-सार्वजनिक दिवाबत्तीची सुविधा-१५ लाख रुपये
-शासकीय कार्यालयांवर सोलर पॅनल बसविणे- २० लाख रुपये
-वाचनालय इमारत बांधकाम- २० लाख रुपये
-क्रीडांगण विकास- २० लाख रुपये
-गावातील शासकीय जागांचे सौंदर्यीकरण- १५ लाख रुपये
या निर्णयाचे ३ मोठे फायदे
-अंधारावर मात: गावातील मुख्य रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्ती मुळे रात्रीची सुरक्षितता वाढणार.
-ऊर्जा बचत + शिक्षण: ग्रामपंचायत कार्यालयांवर सोलर पॅनल बसल्याने वीजबिल वाचेल. तर वाचनालयमुळे गावातील विद्याथ्र्यांना अभ्यासासाठी हक्काची जागा मिळेल.
-खेळ आणि सौंदर्य: क्रीडांगण विकास आणि सौंदर्यीकरण यामुळे तरुणांसाठी खेळाचे मैदान आणि गावाला नवा लुक मिळणार.
महत्त्वाची अट - दुबार निधीला ‘ना’
शासनाने स्पष्ट केले आहे की, या योजनेतून मंजूर होणारी कामे इतर कोणत्याही शासकीय योजनेतून पुन्हा मंजूर करता येणार नाहीत. म्हणजेच एकाच कामासाठी दोन ठिकाणचा निधी घेता येणार नाही. ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘या निर्णयामुळे गावातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम होतील आणि गावांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल.’
ग्रामपंचायतींनी आता प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषदेकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.