आर्वी,
mla wankhede ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधून प्रत्येक गावाला समृद्ध बनवणे हेच आपले मुख्य ध्येय आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून गावांचा चेहरामोहरा बदलणे सहज शक्य आहे. ’विकसित भारत २०४७’ चे स्वप्न साकार करायचे असेल, तर सर्वप्रथम ग्रामीण भाग आणि ग्रामपंचायत विकसित झाली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार सुमित वानखेडे यांनी केले.
स्थानिक रोशन सेलिब्रेशन हॉल येथे आर्वी पंसतर्फे आयोजित विकसित भारत रोजगार व आजीविका हमी (ग्रामीण) अंतर्गत विशेष कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिपच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) ज्ञानदा फनसे, मनरेगा बीडीओ शितल हिवाळे, गटविकास अधिकारी शिवशंकर इंगोले, यशश्री काटोले, वरुण पिसे, राजेश अवघडे यांची उपस्थिती होती.
आ. वानखेडे पुढे म्हणाले की, या योजनेंतर्गत ३१८ प्रकारच्या कामांचा समावेश असून, यातील निधी व अभिसरणाचा योग्य वापर केल्यास ज्या गावात वर्षाला अवघे ४ ते १० लाखांचे काम होते. तिथे आता १ ते १.५ कोटी रुपयांपर्यंतचा भरघोस निधी उपलब्ध होऊ शकतो. ‘व्ही.बी.’ म्हणजेच ’विकसित भारत’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे जे ध्येय दिले आहे. त्याचा पाया आपल्या गावांमधूनच रचला गेला पाहिजे. ज्या ग्रापं अभिसरणाच्या माध्यमातून कामांची मागणी करतील, त्यांना प्राधान्याने निधी दिला जाईल. १०० मीटर रस्त्याची मागणी करणार्या गावात अभिसरणातून २०० मीटरचा रस्ता मंजूर करून देण्याची जबाबदारी आपली असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.mla wankhede शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी माहिती अभावी किंवा अनास्थेमुळे परत जाणे योग्य नाही. त्यामुळे सर्व सरपंचांनी व ग्रामसेवकांनी जास्तीत जास्त जॉब कार्ड्स तयार करून विकासाचा हा निधी गावात खेचून आणावा. पंचायत समिती आर्वी व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या योजनेच्या अंमलबजावणीत संपूर्ण राज्यात अव्वल क्रमांक पटकावा, असे आव्हान त्यांनी केले.
संचालन रविकांत बुरघाटे यांनी केले तर आभार कृषी अधिकारी संजय बमनोटे यांनी मानले.